वर्ल्ड क्लास अजनी रेल्वे स्थानकावरची बत्ती गुल, तब्बल तासभर स्थानकावर अंधाराचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 21:57 IST2025-08-31T21:56:12+5:302025-08-31T21:57:25+5:30
ट्रेन सुटण्याची वेळ अन् प्रवाशांची त्रेधातिरपट

वर्ल्ड क्लास अजनी रेल्वे स्थानकावरची बत्ती गुल, तब्बल तासभर स्थानकावर अंधाराचे साम्राज्य
नरेश डोंगरे - नागपूर
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अत्यंत महत्वाचे असलेल्या अजनी रेल्वे स्थानकावर रविवारी सायंकाळी हमसफर एक्सप्रेस सुटण्याची वेळ झाली असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रेल्वे स्थानक काळोखात बुडाले. तब्बल एक तास वीज पुरवठा खंडित होता त्यामुळे प्रवाशांची मोठी त्रेधातिरपट उडाली.
अजनी रेल्वे स्टेशनला वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन बनविले जाण्याची रेल्वे बोर्डाकडून घोषणा झाली आहे. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला असून तसे कामही सुरू आहे. अशा या अजनी स्थानकावर वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. आज रविवारी सायंकाळीही तसेच झाले. अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस अजनी स्थानकावर येऊन उभी झाली. ती सुटण्याच्या तयारीत असल्याने प्रवाशांची चढण्या-उतरण्याची गडबड घाई सुरू होती. अनेक जण धावपळ करीत होते. अशात सायंकाळी ६.३० च्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे स्थानकावर अंधार निर्माण झाला. अंधारामुळे घबराट उडालेल्या प्रवाशांनी धावत पळत ट्रेन गाठण्याचा प्रयत्न केला. काहीजण लगेजसह धावताना पडल्याचे सांगितले जात होते. तब्बल तासभर वीज पुरवठा खंडित होता अन् प्रवासी मोबाईलच्या टॉर्चमध्ये स्वत:भोवती कसा बसा प्रकाश करून आपल्या सामानाची सुरक्षितता करीत होते.
विशेष म्हणजे, अजनी स्थानकावरचा वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही अनेकदा अशी घटना घडली आहे. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनाकडून महावितरणकडे बोट दाखविले जाते. मात्र, रेल्वे प्रशासन तसेच महावितरण कडून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचे प्रवासी म्हणतात.
अपघाताचा धोका
वर्ल्ड क्लासची घोषणा झालेल्या अजनी स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडथळेदेखिल आहे. अशा वेळेस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अंधार पसरल्यास प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन तसेच महावितरणने या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
अनेकांना झाला मनस्ताप
सायंकाळी ६.३० पासून खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल तासभरानंतर पूर्ववत झाला. या तासाभराच्या कालावधीत स्थानकावर येणाऱ्या, या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी जिना चढउतर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या संबंधाने अजनी स्टेशन मॅनेजर माधुरी चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वीजपुरवठा खंडित होण्यासाठी महावितरण जबाबदार असल्याचे म्हटले.