लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाबोधी महाविहार (बोधगया) मुक्त करा आणि नागपूरच्यादीक्षाभूमीचे विनाविलंब सौंदर्गीकरण करा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि भिक्खुसंघ यांच्या वतीने मंगळवार, १ जुलैपासून संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन ३१ जुलैपर्यंत ३१ दिवस चालणार आहे.
हे धरणे आंदोलन भन्ते प्रियदर्शी, भन्त डॉ. चंद्रकीर्ती, पदमाकर गणवीर, शंकरराव ढेगरे, प्रकाश दार्शनिक, विजय मेश्राम यांच्या नेतृत्वात ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. भंते डॉ. चंद्रकीर्ती यांनी आंदोलनाद्वारे, बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त करण्याची, बिहार सरकारचा १९४९ चा बीटी कायदा रद्द करण्याची आणि दीक्षाभूमीचे सौंदर्याकरण करण्याची मागणी असल्याचे सांगितले. या आंदोलनात पपीता खोब्रागड़े, उषा बौद्ध, वीणा नगरारे, सरोज राजवर्धन, विनय ढाके, नरेंद्र थूल, लक्ष्मीकांत मेश्राम, बी. के. हिवराळे, गंगाधर कांबळे, विशाल वानखेडे, माया पाटील, रजनी पिल्लेवान, डॉ. तक्षशीला वासनिक, अविनाश कठाने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
दीक्षाभूमीच्या सौंदर्गीकरणासाठी धरणे आंदोलनदीक्षाभूमी बचाव-विकास सौंदर्गीकरण समितीच्यावतीने मंगळवारी दीक्षाभूमी परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. दीक्षाभूमीच्या लगत असलेल्या सीआरसी (कॉटन रिसर्च सेंटर) च्या जमिनीचे हस्तांतरण करून दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्याकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. वर्षभरापासून समितीने विविध पातळ्यांवर प्रशासनासोबत चर्चा केली. एनआयटी अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना निवेदन दिले, पण समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. शेवटी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. या आंदोलनात आंबेडकरी जनतेने मोठ्या उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्याकरण त्वरित करावे अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला.