चला जाणून घेवू या, शुन्यातून भरारी घेणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा...
By जितेंद्र ढवळे | Updated: July 18, 2023 18:07 IST2023-07-18T18:06:22+5:302023-07-18T18:07:10+5:30
पुस्तिकेचे प्रकाशन : पीएमएफएमई योजनेत एक हजारपेक्षा अधिक उद्योग सुरू

चला जाणून घेवू या, शुन्यातून भरारी घेणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा...
नागपूर : आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये (पीएमएफएमई) नागपूर विभागात १ हजार ४११ लाभार्थींना उद्योग सुरू करण्यासोबतच उद्योगांच्या विस्तारासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. राज्यात वैयक्तिक लाभार्थी घटकांतर्गत सर्वाधिक प्रकरणे नागपूर विभागात मंजूर झाल्याची माहिती, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे यांनी दिली.
वनामती येथील सभागृहात नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेत ‘पीएमएफएमईअंतर्गत उद्योजकांच्या यशोगाथा’ पुस्तिकेचे प्रकाशन नागरे यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेत नागपूर विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, प्रकल्प उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा संसाधन व्यक्ती सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत असून याअंतर्गत पारंपरिक तसेच स्थानिक उत्पादनांना कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. विभागात या योजनेंतर्गत सुरू केलेल्या यशस्वी उद्योजकांच्या यशकथा संकलित करण्यात आल्या असून त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपातील निवडक यशोगाथांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. विभागात १ हजार ४११ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यात ३०९, वर्धा जिल्ह्यात २८२, भंडारा जिल्ह्यात १६९, चंद्रपूर जिल्ह्यात २९७, गोंदिया जिल्ह्यात २०५ तर गडचिरोली जिल्ह्यात १४९ प्रकरणांचा समावेश आहे.
नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी पीएमएफएमई योजनेमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक उद्योग सुरू झाले असून ग्रामीण भागातील उत्पादित कृषी मालावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे संचलन अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी मानले.