हत्तींना निवडू द्या त्यांचे घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:41 AM2022-01-23T11:41:47+5:302022-01-23T11:42:18+5:30

हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. आपल्याला काय पचते, काय झेपते हे त्याला उत्तम कळते. माणसाने हत्तींचे जंगल खाल्लेच आहे, आणखी किती त्रास देणार हत्तींना?

let the elephants choose their home | हत्तींना निवडू द्या त्यांचे घर!

हत्तींना निवडू द्या त्यांचे घर!

googlenewsNext

आनंद शिंदे, हत्ती अभ्यासक, संस्थापक, ट्रंक कॉल द वाइल्डलाइफ फाउंडेशन  

कदा कोकणामध्ये मोर्ले गावाजवळ  हत्ती ट्रॅकिंगचे काम करत होतो.  हत्ती स्वतःचे घर निवडत असताना किती बारीक गोष्टींचा विचार करतो हा अनुभव इथे घेतला.  असाच अनुभव  नंतर विदर्भात ताडोबातही आला आणि गडचिरोलीतही. या तिन्ही ठिकाणी आम्ही राहात होतो त्या जागेचं तापमान वेगळं होतं आणि स्वतःसाठी हत्तींनी निवडलेल्या जंगलातल्या घरांमध्ये  छान थंडावा होता, हवेत ओलावाही जाणवत होता. आपलं शरीर कसं आहे आणि त्याला काय पद्धतीच्या वातावरणाची गरज आहे याबद्दल हत्तीचा अभ्यास कमालीचा छान होता ! 

कोकणासारख्या भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीचे घर मिळणं सोपं, पण, विदर्भात  पाण्याची उपलब्धता  कमी होती. तरीदेखील ओडिसा आणि छत्तीसगढ पार करून महाराष्ट्रात आलेला हत्तींचा कळप अशा परिसरातून फिरत होता जिथे पाण्याची मुबलक सोय होती. सहसा  शहरात राहणाऱ्या माणसांना  गवत आणि केळी ह्यापुढे हत्ती काय खातो हे फारसं माहीत नसतं. पण, वेगवेगळ्या  प्रकारची लाकडं, बांबू जंगलात असलेलं गवत, गरम वातावरणात थंड राहण्याकरिता बेलाची फळं असे बरेच पर्याय हत्ती स्वतःकरता उपलब्ध करून घेतो. एवढ्या मोठ्या शरीराचे पोट भरायचं म्हणून हत्ती स्वतःकरता फारशा आवडीनिवडी ठेवत नाही. जंगलातून चालत असताना जे जे खाण्यायोग्य झाड, पाला, गवत, लाकूड त्याला मिळतं ते तो मनापासून खातो. जंगलात जर, फणस असेल तर, मात्र हत्ती खूश होतो. सुपीक  डोक्याचा हा भव्य प्राणी नदीकाठी फिरत असताना चिखलात सोंड घालून काहीतरी शोषून घेताना  दिसतो. 

चिखल नक्कीच खात नसतो   तो ! त्या चिखलातन असे क्षार शोषून घेतो की, ज्याच्यामुळे त्यांच्या शरीराला असलेली मिठाची गरज पूर्ण होते.  हत्तीने राहण्यासाठी निवडलेला परिसर इतका सुरक्षित असतो की, विनाकारण जर तुम्ही हत्तीच्या वाटेला गेलात आणि हत्तीने तुम्हाला जाऊ द्यायचं नाही असं ठरवलं तर, ते हत्तीसाठी सहज शक्य असतं. कोकणामध्ये  झाडी एकदम दाट होती तर, विदर्भात विरळ  झाडांची रचना अशी होती की, जर तुम्हाला जंगलाची माहिती नसेल तर, तुम्ही हमखास चुकणार किंवा कळप मागे लागला तर, धावताना नक्की धडपडणार! हत्ती हा प्राणी जेवढा बुद्धिमान तेवढाच भावनाप्रधान. कळपात राहणारा हा प्राणी कळपातल्या प्रत्येक सदस्याबद्दल प्रेम आणि आदर राखून असतो. दोन वर्षापर्यंत कुठल्याही पिल्लाला कळपातला कोणी ओरडताना सहसा दिसत नाही. त्याचं नटखट असणं, त्याची धावपळ गोंधळ हे सगळं खूप एन्जॉय केलं जातं. मला अजूनही आठवतंय की, गजराज हत्ती चिडला होता आणि त्यानं एकाला ठार मारलं होतं. त्याला शांत करण्याकरता मी तिथे गेलो, दहा दिवस त्याच्याबरोबर राहिलो. 

गजराज शांत झाला आणि आम्ही त्याला वनखात्याकडे हॅन्डओव्हर करून निघालो. जंगल सोडायच्या आधी त्याला भेटायला गेलो, माझ्या पद्धतीने मी त्याच्याशी संवाद साधला. गजराज अगदी शांतपणे माझ्याकडे बघत होता...... एकटक. हत्तीकडून निघाल्यावर मी सहसा मागे बघत नाही. पण, आम्ही त्या परिसराच्या बाहेर गेल्यावर मी न राहून मागे बघितलं. आम्ही दिसेनासे झालो, त्याच्यानंतर गजराज पुढचे दोन पाय झाडाला लावून सरळ उभा राहिला होता आणि झाडांच्या वरून आमच्याकडे पाहत होता. पाच टनाचा हत्ती पण, अगदीच लहान बाळ वाटत होता. 

कमलापूर मधल्या कळपाने  तीन दिवसांमध्ये लागोपाठ आपली दोन पिल्ले गमावली त्यावेळी देखील असाच कठीण प्रसंग आला  होता. कळपाची प्रमुख मादी खचलेल्या दोन्ही आयांचं हर एक प्रकारे सांत्वन करत होती. ती एकटी पडू नये म्हणून कोणी ना कोणी तिच्याबरोबर राहावं अशी रचना करत होती. मी गेल्यावर मात्र तिने माझ्यावर फारच विश्वास दाखवला. दोन्ही आयांना माझ्या हवाली केलं. त्या शांत झाल्यावर या आजीबाईंनी येऊन सोंडेने मला स्पर्श करून आपली कृतज्ञता व्यक्त केली! हत्तीची घटत असलेली संख्या , घटत चाललेलं जंगल  त्यामुळे हत्ती त्रस्त आहेच. अशा परिस्थितीत त्यांना माणूस म्हणून आपल्याकडून माणुसकीची आणि खऱ्या सकारात्मक मैत्रीची गरज आहे.

हत्तीच्या शेणावर सात ते सतरा हजार किडे जगतात. 

त्याच्या पावलाच्या खोल ठशात मुंग्या येतात, मग, बेडूक येतो. बेडकाला खायला साप ! पक्षी. फुलपाखरे. मधमाशा. साऱ्यांचे चक्र यावर चालते. हत्ती हा निसर्गाचा इंजिनिअर व आर्किटेक्ट आहे. तो जंगलाला समृद्ध करतो. जगवतो. 

सोंड म्हणजे हत्तीचा हात. फांदी मोडायला सोंड. खाण्याची वस्तू तोंडात टाकायला सोंड. हत्ती सोंडेने गवताची छोटी काडीही उचलू शकतो.

हत्तींचा मेंदू मोठा असून बुद्धिमत्तेत तो फार वरच्या स्तरावर आहे. हत्तीकडे वंश परंपरागत (जेनेटिक) स्मरणशक्ती (मेमरी) असते.
 

Web Title: let the elephants choose their home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.