सेवाकार्यातून दिले स्वावलंबनाचे धडे!

By Admin | Updated: March 21, 2015 02:37 IST2015-03-21T02:37:53+5:302015-03-21T02:37:53+5:30

या प्रतिष्ठानाच्यावतीने अस्थिव्यंगाच्या व्याधीने पीडित असलेल्या गरीब व गरजू मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे.

Lessons learned from self-service! | सेवाकार्यातून दिले स्वावलंबनाचे धडे!

सेवाकार्यातून दिले स्वावलंबनाचे धडे!

या प्रतिष्ठानाच्यावतीने अस्थिव्यंगाच्या व्याधीने पीडित असलेल्या गरीब व गरजू मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जात आहे. त्यांच्या आयुष्यातील अंधारावर मात करून स्वयंप्रकाशित होण्याचा अर्थही सांगितला जात आहे. मागासलेल्या व दुर्गम भागातील मुलांमध्ये ही नवी ऊर्जा पेरण्याचे काम ही संस्था सलग दहा वर्षांपासून करीत आहे. नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान त्या संस्थेचे नाव. गरीब व गरजू मुले जी न्यूरॉलॉजिकल कमकुवत व अस्थिव्यंगाच्या व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांना मोफत औषधोपचार करून त्यांचे अपंगत्व दूर करणे व त्यांनी कुणावरही अवलंबून न राहता इतर सामान्य मुलांसारखे जीवन जगण्यास समर्थ करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या कार्याची सुरुवात २००६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून झाली. त्यानंतर या कार्याची व्याप्ती महाराष्ट्रातील भंडारा, अमरावती, गोंदिया व नागपूर जिल्ह्यापर्यंत वाढविण्यात आली. आता या सेवाकार्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश, छत्तीसगड व ओरिसा या राज्यातील गरजू लोकापर्यंत वाढविण्यात आला आहे.
सेरेब्रल पाल्सी व मतिमंदता, क्लब फूट, कमी उंची असणे, जळल्यामुळे आलेले हातपायाचे व्यंग, मुलांच्या सांध्याला सूज येणे, पाचपेक्षा जास्त बोटे असणे, जन्मत: असलेले अस्थिव्यंग, मुलांच्या हाडांचे इन्फेक्शन, मानेचा तिरळेपणा, हातपाय वाकडे असणे, हातपाय लहान असणे, मुलांचा विकास वेळेवर न होणे, मुल लंगडत चालणे, हिप जॉर्इंटचे डिसलोकेशन असणाऱ्या मुलांवर कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी तालुका स्तरावर शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शिबिरे घेऊन केली जातात. ज्या मुलांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशा मुलांना नागपूर येथील डॉ. विरज शिंगाडे यांच्या चिल्ड्रेन आर्थाेपेडिक केअर इन्स्टिट्यूटमध्ये आणून शस्त्रक्रिया केल्या जातात. दानदात्यांच्या माध्यमातून हे सेवाकार्य गेल्या दहा वर्षांपासून अखंड सुरू आहे. उत्तमराव शिंगाडे व रत्नादेवी शिगांडे यांंच्या कल्पनेतील या सेवाकार्याला वास्तविकतेचे स्वरूप देण्यासाठी अस्थिव्यंग सर्जन डॉ. विरज शिंगाडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. सुरेश चवरे, लहान मुलांचे भूलतज्ज्ञ डॉ. रश्मी शिंगाडे, डॉ. दीपाली मंडलिक, डॉ. सुहास अंबादे, डॉ. मनीष ढोके, डॉ. माधुरी वसुले, डॉ. संदीप मेश्राम, पॅथॉलॉजिस्ट डॉ. नितीन राठी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. कुलदीप सुखदेवे, फिजीओथेरपीस्ट डॉ. अल्पना मुळे, डॉ. प्रवीण कानफाडे, डॉ. सचिन रामटेके, एपिडीमॉलॉजीस्ट डॉ. सुरेश उघाडे, आर्थाेटीस्ट सीताराम काकडे व डॉ. मोहन भावे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Lessons learned from self-service!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.