बाळाला सोडून मातेचे प्रियकरासोबत पलायन
By Admin | Updated: July 21, 2014 00:51 IST2014-07-21T00:51:09+5:302014-07-21T00:51:09+5:30
दोन महिन्याच्या बाळाला वाऱ्यावर सोडून प्रियकरासोबत पळून नागपुरात आलेल्या एका २९ वर्षाच्या महिलेस लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन केल्याची

बाळाला सोडून मातेचे प्रियकरासोबत पलायन
नागपूर : दोन महिन्याच्या बाळाला वाऱ्यावर सोडून प्रियकरासोबत पळून नागपुरात आलेल्या एका २९ वर्षाच्या महिलेस लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली.
उत्तर प्रदेशातील कुटरा जि. बुलंदशहा हल्ली मुक्काम लालडोंगरी, चामोर्शी जि. गडचिरोली येथील रहिवासी पुनम (बदललेले नाव) आपल्या पतीसोबत राहत होती. सहा वर्षापूर्वी लग्न झालेल्या पुनमला दोन मुले आणि एक मुलगी आहे. यातील एक मुलगा दोन महिन्यांचा आहे. मागील काही महिन्यांपासून शेजारीच राहणाऱ्या आणि सलूनचा व्यवसाय करणाऱ्या सूरज सुनील सुत्रपवार (२१) या तरुणाशी पुनमचे सूत जुळले. त्यांच्यात भेटीगाठी वाढून शरीरसंबंध प्रस्थापित झाले. परंतु दोघांच्याही प्रेमसंबंधात पुनमचा पती आणि तिची मुले अडसर ठरत होती. अखेर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही घर सोडले आणि शनिवारी रात्री ११ वाजता ते नागपूर रेल्वेस्थानकावर आले. रेल्वेस्थानकावर रात्रीची गस्त घालीत असताना लोहमार्ग पोलिसांना सूरज आणि पुनमवर संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता दोघांनीही घरून पळून आल्याचे पोलिसांना सांगितले. लगेच दोघांनाही ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांना मोबाईलवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
पुनमची आई आणि तिचा प्रियकर सूरजचा भाऊ रविवारी दुपारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी पुनमच्या आईकडे पुनमला तर सूरजच्या भावाकडे सूरजला सोपविले. यावेळी पोटच्या दोन महिन्यांच्या गोळ्याला सोडून प्रियकरासोबत पळून आलेल्या पुनमकडे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. (प्रतिनिधी)