नेतृत्व गुणांची अनुभवातून शिकवण - कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी
By आनंद डेकाटे | Updated: March 18, 2023 16:05 IST2023-03-18T16:04:12+5:302023-03-18T16:05:44+5:30
रासेयो राज्यस्तरीय प्रेरणा शिबिराचा समारोप

नेतृत्व गुणांची अनुभवातून शिकवण - कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी
नागपूर : नेतृत्व गुण हे पुस्तकांमधून वाचून किंवा कोणी सांगितले म्हणून प्राप्त होत नाही. प्रत्यक्ष व्यवहार तसेच अनुभवातून नेतृत्व गुण विकसित होत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रेरणा-२०२३ हे राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीर आयोजित करण्यात आले. पाच दिवसीय या शिबिराचा समारोप कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत सभागृह येथे करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते.
- विद्यार्थ्यांनी पटकावले पुरस्कार
पाच दिवस घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शिबिरार्थींनी पुरस्कार पटकावले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार छत्रपती संभाजी नगर येथील अभिषेक दैठणकर, द्वितीय पुरस्कार सोलापूर येथील सौरभ वाघमारे तर तृतीय पुरस्कार अथर्व मात्रे याने प्राप्त केला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार पुणे येथील क्रांती खरात, द्वितीय पुरस्कार नांदेड येथील अंजली शहाणे तर तृतीय पुरस्कार अकोला येथील गौरव घाटोळ याने प्राप्त केला.
देशभक्तीपर स्पर्धेत प्रथम पुरस्कार दर्शन, द्वितीय पुरस्कार आदित्य तर तृतीय पुरस्कार सर्वेशने प्राप्त केला. लोक नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिहिका, द्वितीय पुरस्कार अमरावतीची वंशिका सिरसाम तर तृतीय पुरस्कार पूनम वानखडे हिने प्राप्त केला. लोकगीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार अमरावती येथील ऋतुजा, द्वितीय पुरस्कार पवन तर तृतीय पुरस्कार कामाक्षी, सर्वेश व नेहा यांनी संयुक्तपणे प्राप्त केला.