राज्यात 'जुमला'विरोधी कायदा करा : विधान परिषदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:22 PM2019-12-19T23:22:15+5:302019-12-19T23:23:45+5:30

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी केली.

Law against anti-Joomla in the state: Demand in Legislative Council | राज्यात 'जुमला'विरोधी कायदा करा : विधान परिषदेत मागणी

राज्यात 'जुमला'विरोधी कायदा करा : विधान परिषदेत मागणी

Next
ठळक मुद्देराज्यपालांच्या अभिभाषणावर राजकीय टोमणे-चिमटे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी केली. निवडणुकांत मतदानापूर्वी नेते मतदारांना आमिषे दाखवितात व त्यानंतर हात वर करतात. अशाप्रकारे खोटी आश्वासने देऊन निवडून येणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांचा रोख हा केंद्र सरकारकडे होता.
या चर्चेला उत्तर देत असताना सभागृह नेते सुभाष देसाई यांनीदेखील विरोधकांना राजकीय चिमटेदेखील काढले. तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणारे नेते केंद्रातील २१ पक्षांचा समावेश असलेल्या रालोआ व पर्यायाने पंतप्रधान मोदींच्या धोरणांना हरकत घेत आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला.
विरोधक नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत सवाल करीत आहेत. परंतु मागील पाच वर्षांतच येथील स्थिती बिघडली आहे. यात संपूर्ण दोष सेनेवर टाकण्यापेक्षा अर्धी जबाबदारी घ्या, असे देसाई म्हणाले. मित्रांशी कसे वागायचे, याची त्यांना शिस्त नाही. मागील पाच वर्षांत प्रसिद्धी कशी मिळवायची, हे आम्ही शिकलो नाही. माजी मुख्यमंत्री ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले. त्यांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे म्हटले असते तर चित्र वेगळे असते, असे म्हणत मागील पाच वर्षांत भाजपने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचादेखील त्यांनी आरोप केला.
भाजपचे गिरीश व्यास यांनी तीन पक्षांचे हे सरकार ‘तीन तिगाडा, काम बिगाडा’ असल्याचे म्हणत शासन किती ‘रिमोट’ने चालत आहे, असा प्रश्न केला. तर सरकारचे एक रिमोट ‘सिल्व्हर ओक’ व दुसरे रिमोट दिल्लीतील ‘१० जनपथ’ येथे असल्याचा टोला सुजितसिंह ठाकूर यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सरकारच्या तीनचाकी गाडीची चाके वेगळी होणार, असे प्रसाद लाड म्हणाले. राज्यात पाली विद्यापीठाची निर्मिती व्हावी व नागपुरातील श्याम हॉटेल येथे धम्मक्रांतीचे स्मारक व्हावे, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी केली. या प्रस्तावावर हेमंत टकले, रवींद्र फाटक, रामहरी रुपनवर, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, अंबादास दानवे, दत्तात्रय सावंत, अनिल सोले, सुधीर तांबे, रमेश पाटील, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, जगन्नाथ शिंदे यांनीदेखील आपली मते मांडली.

‘राईट टू रिप्लाय’वरून विरोधक आक्रमक
सभागृह नेते उत्तर देत असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १० मिनिटे बोलण्याची विनंती केली. परंतु यात त्यांना ‘राईट टू रिप्लाय’चा अधिकार नाही, असे म्हणत सभापतींनी ती नाकारली. यावरुन विरोधक आक्रमक झाले व शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत कधी मिळणार, असा प्रश्न करत सभात्याग केला. हेमंत टकले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे त्यांना ‘राईट टू रिप्लाय’चा अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्यांना बोलता येणार नाही असे म्हणत सभापतींनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Law against anti-Joomla in the state: Demand in Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.