चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी ‘नमामी चंद्रभागा’ कार्यक्रम राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 21:33 IST2018-07-13T21:31:09+5:302018-07-13T21:33:32+5:30
पंढरपूरला काशीचे स्थान असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ महिन्यात व इतर वारीच्या काळात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी येऊ नये, यासाठी ‘नमामी चंद्रभागा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांडपाणी एकात्मिक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ५९.७५ कोटींचा हा प्रकल्प येत्या २४ महिन्यात राबविला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली.

चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी ‘नमामी चंद्रभागा’ कार्यक्रम राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंढरपूरला काशीचे स्थान असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ महिन्यात व इतर वारीच्या काळात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी येऊ नये, यासाठी ‘नमामी चंद्रभागा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांडपाणी एकात्मिक प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ५९.७५ कोटींचा हा प्रकल्प येत्या २४ महिन्यात राबविला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली.
चंद्रभागेत दुर्गंधीयुक्त व प्रदूषित पाणी येत असल्याने तसेच पात्रात निर्माल्य व शिळे अन्न टाकले जाते. यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याबाबत सदस्य नीलम गोºहे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूरची लोकसंख्या ९८ हजार आहे. वारीच्या काळात पंढरपूर शहरात व आजूबाजूच्या परिसरात भाविकांची गर्दी असते. शहराला २६ एमएलडी पाण्याची गरज असून १९ एमएलडी पाणी पुरवठा होतो. १५. ५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय भुयारी गटारीची संख्याही अपुरी आहे. २०४९ सालापर्यंतच्या शहराची गरज लक्षात घेऊन सांडपाणी एकात्मिक प्रकल्प ७ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजूर करण्यात आला असून यासाठी ५९.७५ कोटींचा निधीही वितरित केला आहे.
वारीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना शौचालय, स्नानगृह अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची सूचना विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, वारीच्या निमित्ताने त्या-त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मंदिर समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा उभारून स्वच्छतेसाठी व्यवस्था उभी केली आहे. दौंड, बारामती, शिरूर, पुणे, आळंदी, पिंपरी चिंचवड या शहरांना सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच सोडावेत, असे आदेश दिले आहेत.चर्चेत सदस्य राहुल नार्वेकर यांनीही सहभाग घेतला.
मोबाईल शौचालयाची व्यवस्था
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प (एसटीपी) या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता राखण्याचे व तपासण्याचे कामही करण्यात येणार आहे. शिवाय वारीच्या ठिकाणी ‘मोबाईल शौचालयांची’ उभारणी करण्यात आली असून त्यांची संख्या व स्नानगृहांची संख्याही वाढविण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.