अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम संधी, आता तरी पास व्हा
By निशांत वानखेडे | Updated: August 2, 2025 20:04 IST2025-08-02T19:23:29+5:302025-08-02T20:04:34+5:30
विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची ‘कॅरी ऑन’ ला मान्यता : विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला यश

Last chance for failed students, pass now
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या महिनाभरापासून विद्यापीठाच्या वर्तुळात गाजत असलेल्या ‘कॅरी ऑन’च्या विषयावर अखेर ताेडगा निघाला. विद्वत परिषदेने विद्यार्थ्यांच्या बाजुने १२ विरुद्ध ३ च्या मताने निर्णय देत कॅरी ऑन लागू करण्यास मान्यता दिली. मात्र ही संधी केवळ यावर्षीपुरती मिळेल, पुढच्या सत्रात कॅरी ऑन लागू राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी काेणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण व्हावेच लागेल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी आंदाेलन करीत आहेत. २०२४-२५ सत्रासाठी एटीकेटीनुसार निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठाने २९ ऑगस्ट २०२४ रोजी एक परिपत्रक जारी करून परीक्षेसाठी अतिरिक्त संधी दिली. मात्र, यावर्षी असे कोणतेही परिपत्रक विद्यापीठाने काढले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसमाेर समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची चिंता असून हजारो विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून विद्यापीठात कॅरी ऑन योजनेसाठी अर्ज करत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या विषयावर आंदाेलन करीत विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. विद्यार्थ्यांसाेबत छत्रपती शिवाजी विद्यार्थी संघटना, एनएसयुआय व राष्ट्रवादी युवा सेना या संघटनांनीही विद्यार्थ्यांची ही मागणी लावून धरली हाेती.
दरम्यान विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने यापूर्वी ‘कॅरी ऑन’ला विराेध केला हाेता. कॅरी ऑनमुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचे कारण देत ही मागणी अमान्य केली हाेती. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या संघटनांचे आंदाेलन सुरू हाेती. यावर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डाॅ. माधवी खाेडे-चवरे यांनी विद्वत परिषदेकडे पुनर्विचारासाठी हा प्रस्ताव पाठविला.
शनिवारी कॅरी ऑनच्या विद्वत परिषदेची बैठक झाली. बैठकीदरम्यान १२ सदस्य विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व ३ सदस्य विराेधात हाेते. ७ सदस्य तटस्थ हाेते. त्यानंतर २०२५-२६ या सत्रासाठी कॅरी ऑन लागू करणारा असल्याचे डाॅ. माधवी खाेडे यांनी जाहीर केले. मात्र ही संधी केवळ या एकाच सत्रापुरती लागू असेल. पुढच्या सत्रासाठी कॅरी ऑनची याेजना लागू राहणार नाही, असेही कुलगुरू यांनी स्पष्ट केले.
या सहा अभ्यासक्रमांना लागू नाही
कॅरी ऑनची याेजना इंजिनीअरिंग, लाॅ व पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना लागू असेल. मात्र सहा अभ्यासक्रमांना कॅरी ऑन लागू नसेल. यामध्ये फार्मसी काॅन्सिल ऑफ इंडियाअंतर्गत असलेले बी.फार्म., एम.फार्म व शिक्षण विभागाचे बी.एड., एम.एड., एम.पी.एड. आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळणार नाही.