नागपुरात विद्यार्थिनीला भररस्त्यावर मारहाण : सडकछाप मजूनंचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:43 IST2018-10-13T19:42:35+5:302018-10-13T19:43:39+5:30
सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल केला.

नागपुरात विद्यार्थिनीला भररस्त्यावर मारहाण : सडकछाप मजूनंचे कृत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल केला.
अली मनिहार (वय २५), शहजाद खान (वय २३) आणि वीरू मुजावर (वय २४), अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी मनिहार हा ८ आॅक्टोबरपासून पीडित मुलीचा पाठलाग करतो. ती शिकवणी वर्गाला जात असताना तिच्याशी सलगी साधण्याचा प्रयत्न करतो. गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास असेच झाले. ती शिकवणी वर्गाला जात असताना मनिहार, शहजाद आणि वीरू हे तिघे तिचा पाठलाग करू लागले. त्यांच्या भीतीमुळे ती शाळेच्या गेटजवळ उभी झाली. आरोपी तेथे येऊन तिच्याशी लज्जास्पद वर्तन करू लागले. पीडित मुलीने त्यांना विरोध करून हा प्रकार वडिलांना सांगेन, असे म्हटले. त्यामुळे आरोपी मनिहारने तिला मारहाण करून तुझे वडील माझे काय बिघडवतील, असे म्हणत त्यांना जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. यामुळे प्रचंड दहशतीत आलेल्या मुलीने आपल्या पालकांना हा गैरप्रकार सांगितला. त्यांनी धीर देऊन तिला एमआयडीसी ठाण्यात नेले. तेथे तिची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी विनयभंग करणे, मारहाण करणे आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली आरोपी मनिहार, शहजाद आणि वीरू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.