कोव्हॅक्सिनला आता हमीपत्राची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:35+5:302021-03-15T04:07:35+5:30
लोकमत इम्पॅक्ट नागपूर : कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन लसीची कार्यक्षमता जवळपास ८१ टक्के असल्याचे चाचणीच्या निष्कर्षातून ...

कोव्हॅक्सिनला आता हमीपत्राची गरज नाही
लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन लसीची कार्यक्षमता जवळपास ८१ टक्के असल्याचे चाचणीच्या निष्कर्षातून समोर आले आहे. या संदर्भातील अहवाल ‘डीसीजीआय’कडे सादरही करण्यात आला. परंतु त्यानंतरही लाभार्थ्यांना तीन पानांचे ‘फॅक्ट शीट’ वाचणे, हमीपत्र व लसीकरणानंतर प्रतिकूल परिणामाचा अर्ज भरावा लागत होता. परिणामी, लाभार्थी व केंद्रातील अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत होते. अखेर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने या संदर्भात नव्या सूचना काढल्या. आता याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे या लसीला आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ९ मार्चच्या अंकात ‘कोव्हॅक्सीनची कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतरही लिहून घेतले जात आहे हमीपत्र’ या मथळ्याखाली वृत्त देऊन हा प्रकार उघडकीस आणला होता. हैदराबादच्या भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हॅक्सिन’ लसीची निर्मिती केली जात आहे. कोव्हॅक्सिन चाचणीचे दोन टप्पे पूर्ण झाले असताना व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू असताना या लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (डीसीजीआय) मंजुरी दिली होती. यावरून वादाला तोंड फुटले होते. ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी’ने ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे, लस सुरक्षित व कार्यक्षम आढळून आल्याचे म्हटले होते. १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ तर इतर केंद्रावर ‘कोविशिल्ड’ लस दिली जात आहे. ‘कोव्हॅक्सिन’ देण्यापूर्वी ‘स्क्रिनिंग आणि संमती’ अर्ज भरून घेतला जात होता. यात या लसीचे फायदे व जोखमी समजल्याचे लाभार्थ्यांकडून लिहून घेतले जात होते. मात्र मागील आठवड्यात भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन त्याचे निष्कर्ष सादर केले. यात जवळपास ८१ टक्के लस प्रभावी असल्याचे सांगितले. या संदर्भातील अहवाल ‘डीसीजीआय’कडे सादर करण्यात आला. परंतु संमतीपत्र न घेण्याबाबत कुठल्याही सूचना ‘कोव्हॅक्सिन’ केंद्रांना प्राप्त झाल्या नव्हत्या. लाभार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेताना त्यांच्या नाना प्रश्नांना केंद्रातील कर्मचाऱ्यांना सामोर जावे लागत होते. वादही निर्माण व्हायचा. अखेर या सर्वांवर आता पडदा पडला. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने याची आता गरज नसल्याचे पत्र केंद्राला दिले आहे.
-आता लाभार्थ्यांची थेट नोंदणी
कोव्हॅक्सिन लस घेताना लाभार्थ्यांकडून ‘स्क्रिनिंग आणि संमतीपत्र’ लिहून घेतले जात होते. परंतु १३ मार्च रोजी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे या संदर्भात पत्र प्राप्त झाले. यात लाभार्थ्यांना ‘फॅक्ट शीट’ वाचणे, संमतीपत्र व लसीकरणानंतर प्रतिकूल परिणामाचा अर्ज भरणे गरजेचे नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे सोमवारपासून लाभार्थ्यांची थेट नोंदणी होईल.
-डॉ. उदय नार्लावार
लसीकरण केंद्रप्रमुख, मेडिकल