कोतवालांना हवाय चतुर्थ श्रेणीचा दर्जा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:14+5:302020-12-04T04:23:14+5:30
कामठी : इंग्रजांच्या काळापासून महसूल विभागात सेवा देणारा कोतवाल चतुर्थश्रेणी दर्जापासून अद्यापही वंचित आहे. कामठी तहसील कार्यालयात कोतवालांची २४ ...

कोतवालांना हवाय चतुर्थ श्रेणीचा दर्जा?
कामठी : इंग्रजांच्या काळापासून महसूल विभागात सेवा देणारा कोतवाल चतुर्थश्रेणी दर्जापासून अद्यापही वंचित आहे. कामठी तहसील कार्यालयात कोतवालांची २४ पदे मंजूर आहेत. त्यातील १० पदे पदे रिक्त आहेत. कोतवालाला सध्यास्थितीत ७ हजार ५०० रुपये इतके मासिक मानधन मिळते. शासनाच्या वतीने ७५०० रुपये प्रोफेशनल टॅक्सची (व्यवसाय) मर्यादा आहे. त्याव्यतिरिक्त महिन्याची मासिक उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीला प्रोफेशनल टॅक्स (व्यवसाय कर) भरावा लागतो. शासनाच्यावतीने कोतवालांना ७ हजार ५०० रुपयांच्या मानधनासह मासिक १० रुपयांचा चप्पल भत्ता मिळतो. त्यामुळे त्यांना ७५१० रुपये प्रत्यक्षात मिळतात. या अधिकच्या दहा रुपायासाठी शासनाच्या वतीने १७५ रुपयांची व्यवसायक कराची कपात त्यांच्या मानधनातून केली जाते. शेती कर, पाणी पाऊस किंवा कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती, कोणत्याही निवडणुका आल्यास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार ,वरिष्ठ लिपिक सर्व अधिकारी कोतवालाला २४ तास राबवून घेत असतात. कोतवालाला शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे इतर भत्ते मिळत नाही. तुटपुंज्या मानधनात त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवाला लागतो. केंद्र सरकारने ४ फेब्रुवारी २०१९ मध्ये एक विशेष जीआर काढून देशातील विविध राज्यातील कोतवालांना अटल पेन्शन योजना लागू केली आहे. गुजरात व त्रिपुरा राज्यात कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी श्रेणीत समाविष्ट करून वेतन श्रेणी लागू करावी व अटल पेन्शन योजना त्वरित अमलात आणण्याची मागणी कामठी तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुभाष वानखेडे यांच्यासह इतर कोतवालांनी केली आहे.