‘टू स्ट्रोक’च्या धुरामुळे कोंडतोय श्वास!
By Admin | Updated: January 25, 2016 04:09 IST2016-01-25T04:09:57+5:302016-01-25T04:09:57+5:30
वाहनांमधील धुरामुळे होणारे प्रदूषण हा साऱ्यांचा चिंतेचा विषय बनला आहे. धुरामुळे श्वसनाचे रोग, अस्थमा सारखे

‘टू स्ट्रोक’च्या धुरामुळे कोंडतोय श्वास!
नागपूर : वाहनांमधील धुरामुळे होणारे प्रदूषण हा साऱ्यांचा चिंतेचा विषय बनला आहे. धुरामुळे श्वसनाचे रोग, अस्थमा सारखे आजन्म सतावणारे दुर्धर रोग होतात. आता या प्रदूषणामुळे स्तनाच्या कर्करोगासारखा असाध्य रोग होत असल्याचेही एका संशोधनातून समोर आले आहे. वाढत्या वाहन प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्लीत ‘सम-विषम’ वाहतूक व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे, असे असताना राज्यात ‘टू स्ट्रोक’ वाहनांचा सर्रास वापर सुरू आहे. या वाहनांमुळे ‘हायड्रो कार्बन’ व ‘कार्बन मोनोक्साईड’ उत्सर्जित होण्याचे प्रमाण मोठे असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षांमुळे नैसिर्गक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद उपसा, शहरातील वाहनांचे वाढते प्रमाण हे पर्यावरण शुद्ध राखण्यास घातक ठरत आहे. जल,वायू,ध्वनी यांचे प्रदूूषण तर पर्यावरणाला मारकच आहे. म्हणूनच शासनाने १५ वर्षांपुढील खासगी आणि आठ वर्षांपुढील व्यावसायिक वाहनांवर पर्यावरण कर आकारण्याचे निर्देश दिले आहे. मात्र परिवहन विभाग या कराला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे ‘टू स्ट्रोक’ वाहने आजही रस्त्यावर मोठ्या संख्येत प्रदूषण पसरवित धावत आहेत. (प्रतिनिधी)
विषारी वायू उत्सर्जित होण्याचे प्रमाण सर्वाधिक
नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात दहा ‘टू स्ट्रोक’ आणि दहा ‘फोर स्ट्रोक’ आॅटोरिक्षांच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. यात ‘टू स्ट्रोक’ आॅटोरिक्षांमधून मानवी शरीरासाठी घातक असलेला ‘हायड्रो कार्बन’ हा वायू १०७९ ते २६३० पीपीएम तर कार्बन मोनोक्साईड ०.७६ टक्के ते २.४८ टक्के उत्सर्जित होत असल्याची नोंद झाली. याच्या तुलनेत ‘फोर स्ट्रोक’ आॅटोरिक्षामधून ‘हायड्रो कार्बन’ १७४ ते ११ पीपीएम तर ‘कार्बन मोनोक्साईड’ ०.०३ टक्के ते ०.९१ टक्क्यापर्यंतची नोंद झाली. यावरून ‘टू स्ट्रोक’ वाहनातून विषारी वायू उत्सर्जित होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले.
एकीकडे ‘युरो-५’ तर दुसरीकडे ‘टू स्ट्रोक’
वर्ष २००० मध्ये जेव्हा वाहन प्रदूषणाचा मुद्दा समोर आला तेव्हा युरोपियन देशाचे मानक अवलंबविण्याचा निर्णय घेण्यात आला. २००४ पासून ‘युरो-१, २, ३’ वाहन उत्पादित होऊ लागली. आतातर ‘युरो-५’वर वाहने येत आहेत.
शहरात सहा हजारावर टू स्ट्रोक आॅटो
शहरात आॅटोरिक्षांची एकूण संख्या १७ हजारावर आहे. यातील ९ हजार ५०० आॅटो ‘ट्रान्सपोर्ट’मध्ये मोडतात. यातील सहा हजारावर आॅटो या ‘टू स्ट्रोक’ तर उर्वरित चार हजार वाहने विविध प्रकारातील असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नुकतेच शहरासाठी नव्या २०७२ आॅटो परवान्याला मंजुरी मिळाली आहे. यामुळे यात पुन्हा ‘टू स्ट्रोक’ वाहनांची भर पडण्याची शक्यता आहे. ‘फोर स्ट्रोक’ आॅटोच्या किमतीत ‘टू स्ट्रोक’ आॅटोची किमत कमी असल्याने आणि हा आॅटो रॉकेलवरही चालविता येत असल्याने शहराच्या प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०१३ मध्ये लावण्यात आली होती बंदी
‘कर्नाटक’ राज्यात ‘टू स्ट्रोक’ वाहनाच्या रजिस्ट्रेशनला बंदी आहे. महाराष्ट्रातही ‘टू स्ट्रोक’ वाहनाचे रजिस्ट्रेशन न करण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेण्यात आला होता. यासाठी वाढते प्रदूषणाचे मुख्य कारण समोर करण्यात आले होते. परंतु नंतर काही महिन्यातच हा निर्णय मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रदूषणाची वाढ झाल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.