फडणवीस एक्स्प्रेस: ३६ कॅबिनेट, सहा राज्यमंत्री; २० नवे चेहरे, विभागनिहाय प्रतिनिधित्व कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 06:30 IST2024-12-16T06:28:14+5:302024-12-16T06:30:10+5:30
मुंबई : मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, ठाणे : प्रताप सरनाईक, नवी मुंबई : गणेश नाईक, रायगड : आदिती तटकरे, भरत गोगावले यांना मंत्रिपदे

फडणवीस एक्स्प्रेस: ३६ कॅबिनेट, सहा राज्यमंत्री; २० नवे चेहरे, विभागनिहाय प्रतिनिधित्व कसे?
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त आहे.
येथील राजभवनच्या हिरवळीवर आयोजित दिमाखदार समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. प्रत्येक मंत्र्यांच्या शपथविधीवेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शपथ घेतलेल्या ३३ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे १९ शिंदेसेनेचे ११ आणि अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्र्यांमध्ये भाजपचे तीन, शिंदेसेनेचे दोन आणि अजित पवार गटाच्या एकाचा समावेश आहे. पंकजा मुंडे, अदिती तटकरे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या चार महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या वाट्याचे एक कॅबिनेट मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.
विभागीय संतुलनाचा विचार करता पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त १० मंत्रिपदे मिळाली. त्या खालोखाल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला प्रत्येकी आठ मंत्रिपदे मिळाली.
भुजबळ, मुनगंटीवारांसह १२ मंत्र्यांना स्थान नाहीच
शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना वगळण्यात आले. त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील आणि संजय बनसोडे (अजित पवार गट), सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार (शिंदेसेना) यांचा समावेश आहे. सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाने केला.
छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले असून, त्यामुळेच ते मेळाव्याला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती. या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या बोचऱ्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.
फोनची प्रतीक्षा, उत्सुकता अन् धाकधूक
- विस्ताराची प्रचंड उत्सुकता होती. शनिवारी रात्रीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी शपथ घ्यायला या असा फोन कोणालाही केला नाही. त्यामुळे धाकधूक वाढली.
- रविवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या भावी मंत्र्यांना फोन केले. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आपआपल्या पक्षातील भावी मंत्र्यांना फोन करत खूशखबर दिली.
-राजभवनात खुल्या जागेमध्ये आजचा समारंभ झाला, त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती आणि आपल्या नेत्याच्या शपथेवेळी त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी समारंभाचे संचालन केले.
१९९१ नंतर नागपुरात प्रथमच शपथविधी समारंभ झाला. प्रत्येक मंत्र्यांचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांनी शपथविधीनंतर अभिनंदन केले.
मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून तर अन्य सर्वांनी मराठीतून शपथ घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खा.सुनील तटकरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड समारंभाला उपस्थित होते.
विभागनिहाय प्रतिनिधित्व कसे?
विभाग शिंदे फडणवीस आधीपेक्षा
सरकार सरकार किती जास्त
कोकण ५ ८ ३
मराठवाडा ६ ६ ०
मुंबई १ २ १
उ. महाराष्ट्र ७ ८ १
विदर्भ ४ ८ ४
प. महाराष्ट्र ६ १० ४
एकूण २९ ४२ १३
मंत्रिमंडळ दृष्टिक्षेपात...
सर्वात तरुण मंत्री अदिती तटकरे वय ३६
सर्वात वयस्कर मंत्री गणेश नाईक वय ७४
२० नवे चेहरे
भाजप - ९, शिंदेसेना - ६, अ. पवार गट - ५
किती मंत्री, कोणत्या वयाचे?
महायुती १.० विरुद्ध महायुती २.०
वयोगट शिंदे फडणवीस फरक
मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ
३५-४० ० २ +२
४१-४५ ० ५ +५
४६-५० १ ४ +३
५१-५५ २ ५ +३
५६-६० ४ ८ +४
६१-६५ ७ १० +३
६६-७० ६ २ -४
७१-७७ ९ ४ -५
एकूण २९ ४२ +१३