किडनी ट्रान्सप्लांटचा मुहूर्त कधी ?
By Admin | Updated: December 8, 2015 04:14 IST2015-12-08T04:14:26+5:302015-12-08T04:14:26+5:30
गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र (किडनी

किडनी ट्रान्सप्लांटचा मुहूर्त कधी ?
गेल्या अधिवेशनात केली होती घोषणा : आरोग्य विभागाची उदासीनता
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
नागपूर : गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र (किडनी ट्रान्सप्लांट सेंटर) सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, तर मेडिकलच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी तीन दिवसांत किडनी ट्रान्सप्लांट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्याची सूचना केली होती. परंतु आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे अद्यापही हे केंद्र सुरूच झाले नाही. विशेष म्हणजे, किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करीत असलेले गरीब रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असलेले नातेवाईक अडचणीत सापडले आहेत.
राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील हजाराहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊन राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची घोषणा २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात विनोद तावडे यांनी केली होती. तीन महिन्यात हे केंद्र सुरू करा, असे निर्देशही मेडिकल प्रशासनाला दिले होते. परंतु घोषणेच्या सात महिन्यानंतर ४ जुलै २०१५ रोजी झालेल्या अभ्यागत मंडळात हा विषय समोर आला. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राला घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाला धारेवर धरले. ‘मुहूर्त शोधत आहात का’, असा थेट सवाल करीत तीन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. परंतु आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मंजुरी नसल्याचे कारण पुढे करीत प्रमाणपत्र राखून ठेवले.
याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी घेऊन काही दिवसांतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक दस्तऐवज सादर केले. परंतु तब्बल तीन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मंडळाने मंजुरी दिल्याचे मिनिटस् मेडिकलला प्राप्त झाले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने हे मिनिटस् आणि प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्याचे पत्र आरोग्य विभागाला पाठविले. परंतु पाच दिवसांचा कालावधी होऊनही प्रमाणपत्राची प्रतीक्षाच आहे.
सात टक्के रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत
बदलत्या जीवन शैलीमुळे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. शंभरपैकी १० जणांना मूत्रपिंडाचे आजार आहेत. त्यातील सात टक्के लोकांचे मूत्रपिंड अत्यंत खराब झालेले आहे. किडनी निकामी होण्याचे युवकांमधील प्रमाणही गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. मूत्रपिंडाच्या विकाराच्या रुग्णासमोर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच पर्याय असतो. यातील प्रभावी उपचारपद्धती प्रत्यारोपण हीच आहे. परंतु खासगी रुग्णालयातील भरमसाठ शुल्कामुळे अनेकांकडे दाते असतानाही ते या शस्त्रक्रियेपासून वंचित आहे.