पिकअप व्हॅनच्या चालकाचे अपहरण, नागपूरच्या टेकडी उड्डाणपुलावर थरार
By योगेश पांडे | Updated: April 21, 2023 18:01 IST2023-04-21T17:59:41+5:302023-04-21T18:01:03+5:30
ॲपमुळे सापडले आरोपी

पिकअप व्हॅनच्या चालकाचे अपहरण, नागपूरच्या टेकडी उड्डाणपुलावर थरार
नागपूर : रात्री देखील बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या टेकडी उड्डाणपूलावर एका चालकांचे अपहरण करत त्याचे वाहन पळवण्यात आले सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली पोलिसांनी काही वेळातच एका आरोपीला अटक केली. चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोबाईल अँपच्या माध्यमातून आरोपींचा ठावठिकाणा कळाला हे विशेष.
प्रकाश हरी मांझी (२७ वर्ष, रघुजी नगर, छोटा ताजबाग) हे त्यांच्या पिकअप व्हॅनने रात्री अडीचनंतर जात असताना जयस्तंभ चौक ते गणेशटेकडी पुलावरून त्यांना चार आरोपींनी अडविले. त्यांनी शिवीगाळ करत मांझी यांना गाडीचे बाहेर काढले व परत जबरदस्ती त्याच गाडीमध्ये बसवुन घेवुन गेले. यावेळी मांझी यांनी समयसूचकता दाखवत ते काम करत असलेल्या कंपनीच्या अँपवर क्लिक केले.
दरम्यान आरोपी त्यांचा मोबाईल व गाडी हिसकावून पळाले. त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांना ते अडचणीत असल्याचे अँपमुळे कळले होते. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. वाहनातील जीपीएस सिस्टमच्या आधारे पोलिसांनी मोहीत उर्फ चुटया सयाजी श्रीमंत (२८, खलाशी लाईन), पंकज उर्फ छोटु किसन गेडाम (३२,खलाशी लाईन) व उमेश उर्फ अम्मू मनोज पैसाडेली (२४, मंगल मंडप जरीपटका) यांचा शोध घेत अटक केली. आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.