कामाचे आमिष दाखवून मजुराच्या पत्नीचे अपहरण
By Admin | Updated: July 21, 2014 00:51 IST2014-07-21T00:51:57+5:302014-07-21T00:51:57+5:30
काम लावून देतो, असे सांगून एका आरोपीने पती-पत्नीला इतवारी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात आणले. पतीला एका ठिकाणी थांबविले आणि पत्नीचे अपहरण केले. दरम्यान इतवारी

कामाचे आमिष दाखवून मजुराच्या पत्नीचे अपहरण
नागपूर : काम लावून देतो, असे सांगून एका आरोपीने पती-पत्नीला इतवारी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात आणले. पतीला एका ठिकाणी थांबविले आणि पत्नीचे अपहरण केले. दरम्यान इतवारी लोहमार्ग पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या पत्नीचा २४ तासात तपास लावण्यात यश मिळविले असून आरोपी अद्याप फरारआहे.
महेशकुमार वटी आणि त्यांची पत्नी मायाबाई (२०) रा. मंडवा, गोंदिया हे कामासाठी टाटा पॅसेंजरने शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजता इतवारी रेल्वेस्थानकावर आले. तेथे ते प्लॅटफार्म क्रमांक १ वर नागपूरला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होते. तेवढ्यात एक अज्ञात आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने पती-पत्नीची चौकशी करून त्यांना काम लावून देण्याचे आमिष दाखविले. त्याने या दोघांनाही शहरात आणले. तुमची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, त्यासाठी फोटो काढावे लागतील, अशी थाप देऊन त्याने महेशकुमार वटी यांच्या जवळून ५०० रुपये घेतले. त्यांना एका ठिकाणी बसवून त्यांच्या पत्नीला फोटो काढण्यासाठी घेऊन गेला. बराच वेळ होऊनही पत्नी न परतल्याने महेशकुमार वटी सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचले.
घटनास्थळ इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांना पुन्हा इतवारी रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आले. तेथे त्यांची हकीकत ऐकल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पती-पत्नीला नागपूर शहरात नेण्यापूर्वी आरोपीने महेशकुमार वटी यांच्या मोबाईलवरून एका महिलेला फोन केला होता. त्या महिलेचा मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला असता ती मोबाईल उचलत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिचा मोबाईल लोकेशनवर लावला. रात्री १२ वाजता या महिलेचे लोकेशन पोलिसांना भेटले. अखेर त्या महिलेने फोन उचलून आरोपीची रेल्वेगाडीत भेट झाल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपी महेशकुमार वटीच्या पत्नीला घेऊन काटोलला गेला होता. तेथे शौचास जाण्याचे कारण सांगून तो पळून गेला. तेथील पोलीस पाटलाने या महिलेस रात्रभर आपल्या घरी ठेऊन सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आणले.
संबंधित महिला इतवारी लोहमार्ग पोलिसात पोहोचली. परंतु आरोपीने तिच्यावर कुठलीही जबरदस्ती केली नसल्याचे तिने दिलेल्या बयाणात म्हटले आहे. दरम्यान आरोपीचा दोन दिवसात शोध घेण्यात यश मिळेल, असा विश्वास इतवारी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल घारपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)