खापरखेडा वीज प्रकल्पामुळे रहिवाशांचे जगणे झाले नरक; हायकोर्टाने घेतली याचिकेची गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:39 IST2025-12-16T16:34:30+5:302025-12-16T16:39:02+5:30
Nagpur : खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे चिचोली व इतर गावांतील रहिवाशांचे जगणे नरकासमान झाले आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

Khaparkheda power project has made the lives of residents hell; High Court takes serious note of the petition
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे चिचोली व इतर गावांतील रहिवाशांचे जगणे नरकासमान झाले आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
राजेश चव्हाण, असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते चिचोली येथील रहिवासी आहेत. या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेतली व आवश्यक मुद्दे रेकॉर्डवर आणण्यासाठी अॅड. नीलेश काळवाघे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, याचिकेवर पुढील कार्यवाही करण्याकरिता १२ जानेवारी ही तारीख दिली.
खापरखेडा वीज प्रकल्पामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये वायू व जल प्रदूषण वाढत आहे. परिणामी, रहिवाशांच्या आरोग्यावर वाईट परिणाम पडत आहे. शेतपिकांचेही नुकसान होत आहे. यासंदर्भात राज्य सरकार व महानिर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, त्यांनी अद्याप काहीच केले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.