रविभवनात कामकाज : सेवानिवृत्त न्यायाधीश झोटिंग यांनी केली कॉटेजची पाहणी नागपूर : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाने भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीत केलेल्या भूखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप लावण्यात आले होते. या खरेदी प्रकरणाच्या चौकशीचे कामकाज रविभवनातील कॉटेज क्रमांक १३ मधून होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश डी.एस.झोटिंग यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. झोटिंग यांनी गुरुवारी दुपारी या कॉटेजला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. त्यांनी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले असून लवकरच चौकशीला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी मंत्री असलेल्या खडसे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’तील जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यानंतर खडसे यांना पदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग करणार आहेत. डी.एस.झोटिंग हे नागपूरचेच असल्यामुळे चौकशीचे कामकाज रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ येथूनच चालणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी सुरू असून आवश्यक त्या सर्व सुविधा येथे पुरविण्यात येत आहेत. कार्यालयासाठी एक स्टेनो, वाहन व इतर आवश्यक साधनसामग्री पूरविण्यात येत आहे. न्या. झोटिंग यांनी कॉटेजला भेट देऊन पाहणी केली असल्याने लवकरच चौकशीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)
खडसेंच्या चौकशीला लवकरच सुरुवात
By admin | Updated: July 29, 2016 02:54 IST