दोन मिनिटांच्या वेळेसाठी खडसेंचा संताप; थेट आकस अन् दुश्मनीचाच आरोप
By योगेश पांडे | Updated: December 18, 2024 18:29 IST2024-12-18T18:28:44+5:302024-12-18T18:29:54+5:30
Nagpur : तालिका सभापतींशी जुंपली

Khadse's anger for two minutes; Direct accusation of resentment and hostility
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना आपली भूमिका जास्तीत जास्त वेळ मांडण्याचा अनेक सदस्यांचा प्रयत्न असतो. यात त्यांना दिलेल्या वेळेचे भानदेखील राहत नाही आणि कुणी आठवण करून दिली तर तीळपापड होतो. असाच प्रकार बुधवारी विधान परिषदेत झाला. विधान परिषदेत तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी वेळेची आठवण करून दिल्याने राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे बुधवारी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दोन मिनिटे अगोदर मला का थांबविले, असा सवाल उपस्थित करत खडसे यांनी डावखरे यांच्यावर आकस आणि दुश्मनीचाच आरोप लावला. यामुळे सभागृहातील सदस्यदेखील अचंबित झाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना खडसे ११.२७ मिनिटांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिभाषणात आदिवासी व अनुसूचित जातींच्या मुद्द्यांचा समावेश नसल्याबाबत खंत व्यक्त केली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी खडसे यांना दहा मिनिटेच बोलण्याची मुभा दिली होती. याची ११.३७ मिनिटांनी डावखरे यांनी बेल वाजवून आठवण करून दिली. यावरून खडसे यांचा पारा चढला. तुम्ही खुर्चीवर असताना मला कधीही वेळ देत नाही, असे म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. तुमचा माझ्यावर इतका आकस का आहे व माझ्याशी तुमची काय दुश्मनी आहे तसेच मला दोन मिनिटे अगोदर का थांबविले, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. खडसेंच्या या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे लगेच उभे झाले व सभापती किंवा तालिका सभापतींबाबत आकसाची भाषा करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तुम्हाला अगोदरच वेळेची कल्पना दिली होती. खुर्चीवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डावखरे यांनीदेखील खडसे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सेनेचे अनिल परब यांनी आक्षेप घेतला. कुणी किती वेळ बोलायचे हे कोण ठरविणार व त्याला कुठल्या नियमाचा आधार आहे, असा सवाल त्यांनी केला. अखेर डावखरे यांनी त्यांना सभापतिपदाच्या खुर्चीवर असलेल्यांना नियम क्रमांक ६२ अंतर्गत हे ठरविता येते असे उत्तर दिले. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच होता.
आदिवासींनी राज्यात जन्म घेऊन पाप केले का?
राज्य सरकार आदिवासी व अनुसूचित जातींच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. नंदुरबारप्रमाणे कोल्हापूर, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतदेखील कुपोषण वाढत असून, राज्यासाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. याची सरकारने चौकशी केली पाहिजे व विशेष मोहीम राबविली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आदिवासींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहेत. ते कीड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन पाप केले का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.