साधनशुचिता पाळा, वाद टाळा

By Admin | Updated: July 19, 2014 02:21 IST2014-07-19T02:21:50+5:302014-07-19T02:21:50+5:30

भाजपाच्या हातात देशातील नागरिकांनी मोठ्या

Keep your eyes closed, avoid disputes | साधनशुचिता पाळा, वाद टाळा

साधनशुचिता पाळा, वाद टाळा

सरसंघचालकांचे अमित शहांना ‘बौद्धिक’ : पक्ष मजबुतीवर भर देण्याचा मंत्र
योगेश पांडे  नागपूर

भाजपाच्या हातात देशातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी देशाची सत्ता सोपविली आहे. पक्षातील अंतर्गत वाद टाळून नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाजपाची खरी ओळख ही साधनशुचिता आहे व ती जपण्याची मोठी जबाबदारी पक्षनेतृत्वावर आली आहे. हे करीत असताना देशपातळीवर पक्ष मजबुतीवर भर देण्यात यावा या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पक्षबांधणीचा मंत्र दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे दीड तास सरसंघचालकांशी चर्चा केली.
निवडणुकांनंतर निर्माण होत असलेले वैदिक प्रकरणासारखे निष्कारण वाद यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा वादांपासून व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्यांपासून भाजपा नेत्यांनी दूर रहावे. देशातील भ्रष्टाचार, महागाई आणि सुरक्षा यांच्याकडे पाहून देशाने भाजपाला कौल दिला. जर भाजपाला मजबूत करायचे असेल तर भावनिक मुद्यांपेक्षा या अपेक्षांच्या पूर्ततेवर जोर देण्यात यावा. अन्यथा पाच वर्षांनंतर जनता भाजपालाही ‘जागा’ दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही असे परखड मतदेखील सरसंघचालकांनी व्यक्त केले. यावेळी अमित शहा यांचे आगामी संकल्प, पक्षबांधणीसाठी नियोजन इत्यादीदेखील सरसंघचालकांनी जाणून घेतले अशी माहिती सूत्रांनी दिली.
पक्षाचा सरकारवर वचक हवाच
आज केंद्रात भाजपाचे सरकार असले तरी पक्षाने स्वत:ची भूमिका ठरवून घ्यावी. सरकार आणि पक्ष यांच्यात फरक असलाच पाहिजे व पक्षाचा सरकारवर अंकुश कसा राहील यासंदर्भात प्रयत्न करायला हवे. भाजपाध्यक्ष या नात्याने तुम्ही याचा आढावा घेतला पाहिजे असेदेखील सरसंघचालकांनी शहा यांना सांगितले. केवळ सरकारवर विसंबून न राहता किंवा अपेक्षांचे ओझे न लादता पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देण्यात यावा असा सल्लादेखील भागवत यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातदेखील संघ-भाजपाचा ‘लोकसभा पॅटर्न’?
लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघाने उत्तर प्रदेश तसेच महत्त्वाच्या राज्यांत सक्रिय भूमिका पार पाडली होती. या राज्यांमध्ये भाजपाची संघटना बांधणी करण्यासाठीदेखील विशेष प्रयत्न करण्यात आले होते. परंतु राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळ्यांवर पक्षाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे पाहता लोकसभा निवडणुकांप्रमाणेच राज्यातदेखील संघप्रचाराचा ‘पॅटर्न’ राबविणे कितपत योग्य ठरेल यावरदेखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहांची स्मृतिमंदिरास भेट
दरम्यान, संघ मुख्यालयी जाण्याअगोदर अमित शहा यांनी रेशीमबाग येथील संघाच्या स्मृतिमंदिरास भेट दिली व संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राज्यसभा खासदार अजय संचेती, आमदार पंकजा मुंडे-पालवे, महापौर अनिल सोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Keep your eyes closed, avoid disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.