ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा: असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:47 IST2020-10-03T00:46:20+5:302020-10-03T00:47:58+5:30
Asimkumar Gupta, Power supply, Nagpur Newsराज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रातदेखील ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी.

ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा: असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रातदेखील ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.
राज्यात येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे शालेय वर्ग व परीक्षा तसेच इतर महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. देखभाल व दुरुस्तीचे काम अत्यंत आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे. तत्पूर्वी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थांशी समन्वय व संवाद साधून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे व त्यासंबंधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.