काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:49 AM2020-08-10T10:49:27+5:302020-08-10T10:50:07+5:30

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Katwal, Khaparkhuti, Chandanbatwa, Kunjircha Mewa; market of forest vegetables | काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार

काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार

googlenewsNext
ठळक मुद्देश्रावणातील भाज्यांनी वाढवा प्रतिकारशक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रावण महिन्यात रानावनातून मिळणाऱ्या रानभाज्या व रानफळे म्हणजे निसर्गाने दिलेला ठेवाच आहे. या रानभाज्या खायला जेवढ्या रुचकर तेवढ्याच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर. अळु, अंबाडी, काटवल, चिवई, गावरानी कोहळे, सुरण, गुळवेल, शेवगा, खापरखुटी, चंदनबटवा, समुद्री घोष, बांबू आस्ते, केना, कुंजीर या भाज्यांची चवच वेगळी. शहरवासीयांसाठी हा तसा दुर्मिळ ठेवा. अशावेळी रविवारी भरपावसात रानभाज्यांचा बाजार भरला आणि नागरिकांनी हा रानमेवा घरी नेण्यासाठी गर्दी केली.
कोरोना काळात प्रत्येकाच्या मनाला भीतीने घेरले आहे. हा आजार होऊ नये यासाठी स्वत:ची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा एकच पर्याय आपल्याजवळ आहे. ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्रावणात मिळणाऱ्या या रानभाज्या व रानफळांचा आहारात समावेश असणे महत्त्वाचे आहे. हे महत्त्व ओळखून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्यात १०४ प्रजातींच्या रानभाज्यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, कृषी विभागाचे सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, आत्माच्या संचालक नलिनी भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. महोत्सवाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदयाल शुक्ल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील भेट दिली.

रानफळांचीही मेजवानी
खास विदर्भाचे वैशिष्ट्य असलेल्या नऊ भाज्यांसह इतरही पालेभाज्या व रानफळे दिसून येतात. अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश महोत्सवात होता. १४ स्टॉलवर रानभाज्यांसह रानफळे उपलब्ध होती. शहरावासीयांसाठी अनोखी पर्वणी ठरली. औषधी गुणधर्मांसह त्यांच्या पाककृतींची माहिती स्टॉलवर असल्याने नागरिकांनी उत्साहाने या भाज्या खरेदी केल्या.

Web Title: Katwal, Khaparkhuti, Chandanbatwa, Kunjircha Mewa; market of forest vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.