कॅटरिना, नर्गिस, मोंथा... विध्वंसक चक्रीवादळांना अशी नावे कोण देते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:27 IST2025-11-03T13:25:15+5:302025-11-03T13:27:22+5:30
Nagpur : नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मोंथा' चक्रीवादळाने विदर्भ, महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान केले. या वादळामुळे फार जीवितहानी झाली नाही. मात्र, इतिहासात अशा अनेक चक्रीवादळांनी जगभरात मोठा विध्वंस घडविला आहे.

Katrina, Nargis, Montha... Who gives such names to destructive cyclones?
निशांत वानखेडे
नागपूर : नुकतेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मोंथा' चक्रीवादळाने विदर्भ, महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान केले. या वादळामुळे फार जीवितहानी झाली नाही. मात्र, इतिहासात अशा अनेक चक्रीवादळांनी जगभरात मोठा विध्वंस घडविला आहे. लाखोंचे बळी घेतले आहेत, अन् लाखोंना बेघर केले आहे. पण, असा विध्वंस घडविणाऱ्या चक्रीवादळांची नावे हा लोकांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. कॅटरिना, नर्गिस, फाणी, तौक्ते.. कोण देत असेल हो या चक्रीवादळांना अशी नावे?
हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी याविषयी 'लोकमत'शी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. भारतीय उत्तर महासागरीय क्षेत्रात म्हणजे विषुववृत्तीय उत्तरेकडील असलेल्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावे दिली जातात. ही नावे या समुद्र सभोवताली असलेले पण जागतिक हवामान संघटनेचे सदस्य असलेल्या देशांकडून सुचवली जातात. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरबस्तान, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात व येमेन अशा १३ आशियाई देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रादेशिक भाषेत चक्रीवादळासंबंधी सुचवलेली नावे व बनवलेली यादीनुसार अनुक्रमानुसार चक्रीवादळाला नाव दिले जाते.
आता आलेल्या 'मोंथा' चक्रीवादळासाठी थायलंड देशाने नाव सुचविले होते. 'थाई' भाषेत मोंथाचा अर्थ 'सुवासिक फुल' असा आहे. यापूर्वीच्या चक्रीवादळाला श्रीलंकेने सुचवलेले 'शक्ती' नाव दिले होते. 'मौथा' नंतर येणाऱ्या चक्रीवादळाला संयुक्त अरब अमिरात देशाने सुचवलेले 'सेन-यार' हे नाव दिले जाईल, ज्याचा अर्थ 'सिंह' असा होतो.
पुढची नावे कोणती?
एप्रिल २०१९ ला १३ देशांनी बनवलेली एकूण १६२ नावांच्या यादीपैकी २४ नावे वापरली असून १४५ नावे यादीत शिल्लक आहेत. पुढील येणाऱ्या चक्रीवादळांची काही नावे खाली दिली आहेत.
१४५ नावांत भारताने सुचविलेली नावे: आग, व्योम, झोर, प्रभाहो, नीर, प्रभंजन, घुरणी, आंबूद जलाधी, वेग इ. ह्यात मराठी-हिंदी नाव 'मेघ' आहे. यापूर्वी भारताने सुचवलेली नावे: अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायु, इ.
काही चक्रीवादळ व त्यामुळे आलेला विध्वंस
- भोला (१९७०, बांगलादेश-पूर्वी पाकिस्तान) : ३ लाख मृत्यू व लाखो बेघर, इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक
- नर्गिस (२००८, पाकिस्तानी नाव-फुल) : सुमारे १.३० लाख मृत्यू, २५ लाख बेघर, म्यानमार, श्रीलंका, भारत (थोडासा प्रभाव), बांगलादेश देश प्रभावित.
- निसर्ग (२०२० महाराष्ट्र, अलिबाग, मुंबई): मुंबईत १२२ वर्षांनंतर आलेले मोठे वादळ.
- फाणी (२०१९ ओडिशा): प्रचंड वेगवान (२०० किमी/ताशी) वादळ
- अम्फान (२०२० पश्चिम बंगाल, बांगलादेशः सुपर सायक्लोन) कोलकाता परिसरात भीषण विध्वंस.
- तौक्ते (२०२१ गुजरात, महाराष्ट्र किनारा): अरबी समुद्रातील अतिशय शक्तिशाली चक्रीवादळ.
- हुदहुद (२०१४ आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम्) : १७५ किमी/ताशी वेगाने धडकले.
- खोल समुद्र किंवा महासागर
- हॅरिवेन कॅटरिना (२००५ अमेरिका, न्यू ऑर्लिन्स) : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक चक्रीवादळांपैकी एक. सुमारे १,८३६ लोकांचा मृत्यू, १० लाख लोक विस्थापित.
- टायफून हैयान (२०१३ फिलिपिन्स) : ३०० किमी/ताशी वेग; हजारो मृत्यू,
- हॅरिवेन सँडी (२०१२ अमेरिका, न्यूयॉर्क, न्यू जर्सी): सुपरस्टॉर्म म्हणून प्रसिद्ध
वादळाचे नाव सुचवलेल्या देशाचे नाव त्यांच्या भाषेत नावाचा अर्थ
सेन-वार संयुक्त अरब अमिरात सिंह
डिट-वाह येमेन येमेन देशातील एका बेटावरील सरोवराचे नाव आहे.
ओनंब बांगलादेश खोल समुद्र किंवा महासागर
मुरसू भारत (तामिळ भाषेतील नाव) ढोल
आकवन इराण राक्षस