जुलैअखेरही नागपूर विभागातील धरणे कोरडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:49 IST2018-07-23T11:47:22+5:302018-07-23T11:49:26+5:30
जुलै महिना संपत आला आहे. परंतु नागपूर विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलैला केवळ ३१.४४ इतकाच पाणीसाठा आहे.

जुलैअखेरही नागपूर विभागातील धरणे कोरडीच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिना संपत आला आहे. परंतु नागपूर विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलैला केवळ ३१.४४ इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळल्यास अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ६ जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने विभागातील धरणे हाऊसफूल्ल होतील, अशी शक्यता होती. सहा तासात तब्बल २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघडण्याची वेळ आली. परंतु त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलै रोजी केवळ ३१.४४ टक्के इतकाच जलसाठा आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतका असून २२ जुलैपर्यंत यात १११७.४१ दलघमी (३१.४४ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात १९७.१२ दलघमी म्हणजे १९.३९ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.८० टक्के, रामटेकमध्ये ३३.२७ टक्के, लोवर नांद वणा ४९.५८ टक्के, वडगाव ४८.८५ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४२.४७ टक्के, सिरपूर २२.४३ टक्के, पुजारी टोला ६४.६५ टक्के, कालीसरार ६३.३५ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- १.७० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९२.७२ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६१.१० टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.२८ टक्के, धाम २९.४९ टक्के, पोथरा ९९.२० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २४.६२ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २५.४१ आणि बावनथडी ३०.९१ टक्के इतका पाणीसाठा आहे.
असोलामेंढा व पोथरा भरले
विभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९२.७२ टक्के इतके भरले आहे. परंतु त्याचा एकूण साठा केवळ ५२.३३ इतका आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प ९९.२० टक्के भरले. त्याची एकूण साठा क्षमताच ३५ दलघमी इतकी आहे. यासोबतच पुजारी टोला, कामठी खैरी, दिना, कालीसरार हे प्रकल्प ५० टक्केवर भरले आहेत.
येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यता
जलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २०. ७३ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.