‘जीम कार्बेट’ शिकारी नव्हे, संशोधक!

By Admin | Updated: October 6, 2014 00:56 IST2014-10-06T00:56:08+5:302014-10-06T00:56:08+5:30

‘जीम कार्बेट’ एक शिकारी होते, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र ते एक शिकारी नव्हे, तर निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संशोधकही होते, असे प्रतिपादन डॉ. अर्चना देशमुख यांनी केले.

Jim Corbett is not a hunter, researcher! | ‘जीम कार्बेट’ शिकारी नव्हे, संशोधक!

‘जीम कार्बेट’ शिकारी नव्हे, संशोधक!

व्याख्यान : अर्चना देशमुख यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘जीम कार्बेट’ एक शिकारी होते, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र ते एक शिकारी नव्हे, तर निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संशोधकही होते, असे प्रतिपादन डॉ. अर्चना देशमुख यांनी केले.
वन्यजीव सप्ताहानिमित्त सृष्टी पर्यावरण संस्था, मैत्री परिवार व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘जीम कार्बेट’ यांच्यावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अतिरिक्त महानिरीक्षक रविकिरण गोवेकर होते. अतिथी म्हणून सृष्टी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बेहरे व मैत्री परिवारचे अरविंद गिरी उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. अर्चना देशमुख यांनी ‘जीम कॉर्बेट’ यांच्यावर संशोधन करून आचार्य पदवी संपादन केली आहे. त्यांना हे संशोधन करताना ‘जीम कार्बेट’ यांच्याविषयी गोळा केलेल्या माहितीचा यावेळी उलगडा करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, ‘जीम कार्बेट’ यांच्याविषयी विचार करताना, एखादा शिकारी वाघाच्या संवर्धनाबद्दल सकारात्मक कसा असू शकतो, असा प्रश्नसहज डोक्यात उभा राहतो.
‘जीम कार्बेट’ यांनी १२ वाघांच्या शिकारी केल्याची नोंद आहे. मात्र ते सर्व वाघ नरभक्षी होते, त्यांनी एकूण १५०० लोकांना मारले होते, हे येथे लक्ष्यात घेतले पाहिजे. यावरून ते हौशी शिकारी होते, असे म्हणता येणार नाही. त्यांना वन्यप्राणी व निसर्गाविषयी जीवापाड प्रेम होते. तेवढेच त्यांना सूक्ष्म ज्ञानही होते.
त्यांचे संपूर्ण बालपण नैनितालमधील निसर्गाच्या सानिध्यात गेले. त्यामुळे त्यांना निसर्ग व वन्यप्राण्यांविषयी फारच सखोल ज्ञान होते. ते अवघ्या दहा वर्षांचे असताना, वन्यप्राणी व निसर्गाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तीन-तीन दिवस जंगलात राहत होते. त्यामुळे त्यांना वन्यप्राण्यांची भाषा कळत होती. वन्यप्राण्यांचा आवाज, त्यांचा अधिवास, सवयी व हालचालींविषयी सखोल ज्ञान होते. त्यावेळी सरकारने वन्यप्राणी व निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी अनेक अवॉर्ड जाहीर केले. परंतु त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही. त्याकाळी मौज व प्रतिष्ठा म्हणून वाघाची शिकार केली जात होती. परंतु ‘जीम कार्बेट’ यांनी हौशीपोटी कधीही वाघाला मारले नाही. हे लक्ष्यात घेतले पाहिजे. त्यांनी वन्यप्राणी व निसर्गावर नेहमीच प्रेम केले असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
संचालन स्वानंद सोनी यांनी केले. माधुरी यावलकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Jim Corbett is not a hunter, researcher!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.