उपचारासाठी नागपुरात आलेल्या दाम्पत्याचे सव्वादोन लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:45 IST2018-09-07T14:43:22+5:302018-09-07T14:45:16+5:30
उपचारासाठी नागपुरात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दाम्पत्याचे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने लंपास केले. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मोरभवन ते रेशिमबाग मार्गावर धावत्या आॅटोत ही धाडसी चोरीची घटना घडली.

उपचारासाठी नागपुरात आलेल्या दाम्पत्याचे सव्वादोन लाखांचे दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपचारासाठी नागपुरात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दाम्पत्याचे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने लंपास केले. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मोरभवन ते रेशिमबाग मार्गावर धावत्या आॅटोत ही धाडसी चोरीची घटना घडली.
मौदा (जि. भंडारा) येथील कालीमातानगरात राहणारे अशोक गुलाबराव बोंढरे (वय ६०) हे गुरुवारी दुपारी औषधोपचारासाठी नागपुरात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपले दागिने जवळच्या कापडी बॅगमध्ये ठेवले होते. मोरभवनमधून बोंढरे दाम्पत्य सक्करद-यातील एका हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. त्यांच्यासोबत २५ ते ३० वयोगटातील ३ व्यक्ती आॅटोत बसले. हे तिघेही रेशिमबाग चौकाजवळ आॅटोतून उतरले. बोंढरे दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी तेथे आपली पिशवी तपासली असता त्यातील रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ही चोरी ‘त्या’ तिघांनीच केली असावी, असा संशय आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.
विशेष म्हणजे, चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे सव्वादोन ते अडीच लाख रुपये असली तरी पोलिसांनी मात्र, जुन्या खरेदी दराप्रमाणे या दागिन्यांची किंमत केवळ १ लाख, २६ हजार नोंदवली आहे.