जरा हटके : पतीने केली पत्नीच्या घरात चोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:58 IST2019-02-18T20:58:21+5:302019-02-18T20:58:53+5:30

विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे.

Jara Hatke: Husband has stolen his wife's house! | जरा हटके : पतीने केली पत्नीच्या घरात चोरी !

जरा हटके : पतीने केली पत्नीच्या घरात चोरी !

ठळक मुद्देपत्नी आणि मुलाचे लॉकर तोडले : सोने-हिऱ्याचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे.
गायत्री नितीन सिन्हा (वय ३७) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या गोधनी मार्गावरील कोलते ले-आऊटमध्ये राहतात. जरीपटक्यात त्यांची पॅथालॉजी लॅब आहे. तर, त्यांचे पती नितीन नंदकिशोर सिन्हा (वय ४१) बेसा येथील अजय पांडेंच्या घरात भाड्याने राहतात. काँग्रेसनगर चौकातील एका हॉटेलमध्ये नितीन मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत.
सिन्हा पती-पत्नीत गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरू असून, तो टोकाला गेल्यामुळे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र, सुटीच्या दिवशी नितीन त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी गोधनीतील घरी येतो. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास नेहमीप्रमाणे नितीन आपल्या मुलांना भेटण्यासाठी गोधनीतील घरी आले. काही वेळेनंतर त्यांनी शयनकक्षातून पत्नी आणि मुलाला दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर आतमधून दार लावून घेत लाकडी कपाटाचे लॉकर तोडले. या लॉकरमध्ये सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे दागिने होते. ते सर्व नितीन यांनी चोरून नेले. ते निघून गेल्यानंतर चोरीची बाब पत्नीच्या लक्षात आली. त्यांनी नितीनला फोन केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गायत्री सिन्हा यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. नितीन यांनी चोरून नेलेल्या दागिन्यांची किंमत २६ लाख, ५५ हजार असल्याचे सिन्हा यांनी तक्रारीत नमूद केले.
पोलिसांची झाली गोची
मानकापूरचे एएसआय एजाज शेख यांनी गायत्री सिन्हा यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती नितीन सिन्हा यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणात मानकापूर पोलिसांची चांगलीच गोची झाली आहे. कारण पोलिसांनी नितीन सिन्हा यांच्याशी संपर्क करून त्यांना या चोरीबाबत विचारणा केली असता त्यांनी चोरीचा इन्कार करून चक्क कानावर हात ठेवले. माझ्याच घरात, माझ्याच दागिन्यांची मी कशाला चोरी करणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी पोलिसांना केला. मी विकत घेतलेले दागिने सोबत नेले, ती चोरी कशी होऊ शकते, असा सवालही नितीन सिन्हा यांनी केला. त्यामुळे पोलीस संभ्रमावस्थेत सापडले आहे.

 

Web Title: Jara Hatke: Husband has stolen his wife's house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.