Jaitley's death mourns BJP's circle in Nagpur | जेटली यांच्या निधनाने नागपूरच्या भाजप वर्तुळात शोक

जेटली यांच्या निधनाने नागपूरच्या भाजप वर्तुळात शोक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर भाजप वर्तुळात शोककळा पसरली आहे. अरुण जेटली यांच्या मृत्यूनंतर भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अरुण जेटली हे संयमित नेते होते. त्यांच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेने भरारी घेतली व त्यांनी देशाला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षाचेच नव्हे तर देशाचेही नुकसान झाले आहे, असा सूर होता.
मी जवळच्या मित्राला मुकलो
विद्यार्थीदशेपासूनच प्रभावी वक्ते म्हणून त्यांचा परिचय होता. देशातील नामवंत वकील म्हणून ते परिचित होतेच. भाजपचा अध्यक्ष असताना अनेक कठीण प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन मिळाले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेता व अर्थमंत्री म्हणून त्यांनी ऐतिहासिक काम केले. प्रखर बुद्धिमत्तेच्या आधारावर युक्तिवाद करण्याची त्यांच्यात अफाट क्षमता होती. मी माझ्या जवळच्या मित्राला मुकलो आहे. सुषमा स्वराज यांच्यानंतर अरुणजी यांचे जाणे हा एक मोठा धक्का आहे.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

झंझावाती व्यक्तिमत्त्वाला देश मुकला
अरुण जेटली हे प्रख्यात वकील, प्रभावी संसदपटू हे होते. त्यांच्या निधनामुळे देश एका झंझावाती व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देशात आर्थिक शिस्त आणली. अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी या काळात पार पाडली. विद्यार्थी नेता ते राजकारणी हा त्यांचा झंझावाती प्रवास होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अशा अत्यंत सक्रिय कार्यकर्त्याच्या जाण्याने भाजपाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री

‘जिनीयस’ व्यक्तिमत्त्व हरविले
अरुण जेटली हे अतिशय हुशार नेते होते. विधी क्षेत्रात त्यांचा दबदबा होता व लोक त्यांना मानत असत. भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी व विचारधारेशी त्यांची कटिबद्धता होती. राज्यसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची भाषणे तर अतिशय उत्तम राहिली. नेहमी संयमित व मुद्देसूदपणे बोलणारे देशाचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली हे खरोखरच राजकारणातील एक ‘जिनीयस’ व्यक्तिमत्त्व होते. कुठलाही मुद्दा असला तरी जेटली हे सखोल विचार व अभ्यास करुन मगच बोलत असत. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
डॉ.परिणय फुके, आदिवासी विकास व वन राज्यमंत्री

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे होते धनी
अरुण जेटली यांच्यासोबत राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली होती. काम करण्याची त्यांची पद्धत थक्क करणारी होती. एक प्रभावी वकील असण्यासोबतच त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. विशेष म्हणजे एक व्यक्ती म्हणून ते अतिशय सहृदयी होते. अरुण जेटली यांच्या मार्गदर्शनात अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे.
अजय संचेती, माजी खासदार

 

 

 

Web Title: Jaitley's death mourns BJP's circle in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.