इतवारीत मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:35 IST2019-12-30T22:27:16+5:302019-12-31T00:35:37+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये सोमवारी सकाळी मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली.

इतवारीत मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये सोमवारी सकाळी मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली. अप डायरेक्शनमध्ये सकाळी ८ वाजता घडलेल्या या घटनेनंतर सकाळी ९.३० पर्यंत ही गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करून रेल्वेगाड्यांची ये-जा सुरु करण्यात आली.
बिलासपूरकडून मुंबईकडे जात असलेली मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रिकामी होती. ही गाडी भरलेली असती तर अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली असती. या घटनेमुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस मेलच्या रुपाने धावते. यात ८ व्हिलर वाहनांची वाहतूक करण्यात येते. विभागाच्या मुख्यालयात यार्डात घडलेल्या या घटनेबाबत विभागाचे जनसंपर्क प्रभारी आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमना यांना विचारना केली असता त्यांनी अल्प माहिती दिली. ही घटना कशामुळे घडली याची माहिती देणे त्यांनी टाळले. महाव्यवस्थापकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये असल्याचे सांगून त्यांनी बोलणे बंद केले. ‘डीआरएम’ आणि ‘सिनिअर डीओएम’ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे रेल्वेला माल वाहतुकीद्वारे उत्पन्न मिळते. माल वाहतुक कमी झाल्यामुळे रेल्वेचे अनेक झोन चिंतेत आहेत. त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मुख्यालयाच्या मुख्य रेल्वेस्थानकाच्या यार्डात मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर रेल्वे रुळाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.