-तरी रिकामटेकडे रस्त्यावर! उपराजधानीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:35 PM2020-03-24T12:35:29+5:302020-03-24T12:41:25+5:30

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात शहरात परिस्थिती हाताळली जात आहे. पण, लोकच ‘सिरिअस’ नाहीत हे चित्र शहरात सोमवारी ‘लोकमत’च्या चमूला दिवसभर दिसले.

-It's empty on the road! Reality in the sub-capital | -तरी रिकामटेकडे रस्त्यावर! उपराजधानीतील वास्तव

-तरी रिकामटेकडे रस्त्यावर! उपराजधानीतील वास्तव

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोरोना’बाबत ‘सिरिअसनेस’च नाही चीन, इटलीची स्थिती आणायची आहे का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीन, इटलीत ‘कोरोना’ संसर्गाने अनेकांचे बळी गेले. प्रचंड वेगाने संसर्ग होणारा हा व्हायरस नागपूरपर्यंत येऊन पोहोचलाय. सरकारी यंत्रणा अलर्ट झाली आहे. प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. कलम १४४ लागू असल्याने पाचपेक्षा अधिकजण एकत्र येऊ शकत नाहीत. पण, लोक अनेक ठिकाणी झुंडीने गर्दी करीत आहेत. रिकामटेकडे अनेकजण रस्त्याच्या बाजूला एकत्र येऊन गोष्टी करीत आहेत. किमान १५दिवस व त्याहूनही अधिक काळ एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी लोकांना गांभीर्यच राहिलेले नाही. पोलीस यंत्रणा कौतुकास्पद काम करीत आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात शहरात परिस्थिती हाताळली जात आहे. पण, लोकच ‘सिरिअस’ नाहीत हे चित्र शहरात सोमवारी ‘लोकमत’च्या चमूला दिवसभर दिसले.
धंतोलीत दुकानांसमोर गप्पा
जनता कर्फ्यूला लोकांनी जी दाद दिली, त्याच्या विपरीत दुसऱ्या दिवसाची स्थिती होती. धंतोलीतील मेहाडिया चौक ते पंचशील चौकादरम्यान फक्त दुकाने बंद होती. मात्र वाहनचालकांची ये-जा नेहमीसारखी होती. पंचशील चौकातील सिग्नलवर गाड्यांची गर्दी होती. यशवंत स्टेडियमच्या परिसरातही काही लोकांचा समूह गप्पा करीत होता. बंद असलेल्या दुकानांसमोर लोक गप्पा करीत होते.
गुजरवाडीत रस्त्यावर रंगत होती मैफल
मोक्षधाम घाटाकडून गुजरवाडीत प्रवेश करताच कॉर्नरला बंद असलेल्या पानठेल्याच्या मागे काही युवक बसले होते. काहींचे मोबाईलवर बोलणे सुरू होते. या युवकांजवळ खर्रासुद्धा होता. पानठेल्याच्या बाजूला दोन ज्येष्ठ नागरिक बाकावर बसले होते. गुजरवाडीतील गल्लीबोळ्यात बायका एकत्र येऊन गप्पा करीत होत्या. हे सर्व नागरिक अतिशय बेसावध होते. कुणालाही कोरोनाच्या विषाणूची गंभीरता नव्हती.
मेडिकल चौक ते गांधीबाग चौकादरम्यान सर्वच ‘आलबेल’
दुपारच्या सुमारास दुकाने बंद सोडल्यास कुठलीही गंभीरता कुणालाही नसल्याचे दिसून आले. मेडिकल चौक ते उंटखाना रोडवरील डाव्या बाजूच्या एका किराणा दुकानासमोर लोकांची गर्दी होती. वाहनांची वर्दळ तर नेहमीसारखीच होती. उंटखाना चौकातील सिग्नलवर एका भागात किमान ५० वाहने तरी उभीच होती. उंटखाना चौकातून महालात प्रवेश करताच डाव्या बाजूच्या एका डेली नीड्समध्ये लोक गर्दी करून होते. बंद दुकानांसमोर लोकांच्या गप्पा सुरू होत्या. चिटणीस पार्क चौकात काही युवकांच्या चर्चा रंगल्या होत्या. लोक रस्त्यावर होते, वाहनांची वर्दळ सुरू होती. पोलीस प्रशासनानेही सोमवारी शिथिलता दाखविली होती.
पाचपावली पुलाखाली मेळावाच
पाचपावली पुलाखालील वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांना आजाराची माहिती आहे की नाही हेच कळत नव्हते. वस्त्यांमध्ये महिलांच्या छान चर्चा सुरू होत्या. मुले क्रिकेट व अन्य खेळात व्यस्त होती. पुलाखाली बसून काही ज्येष्ठ मंडळी सिगारेट, बिडीचे झुरके घेत होते. काही तरुण गाड्यांवर बसून खर्रा खात चर्चा करीत होते. लोकांच्या छान चर्चा, गप्पा, थट्टामस्करी सुरू होती. रस्त्यावर जागोजागी लोकांचा गराडा होता.
गोळीबार चौकातील परिस्थिती सामान्य
गोळीबार चौकात ते मेयो रुग्णालय चौकात दोन वाहनांवर ट्रिपलसीट बसलेले तरुण बेधुंद वाहने चालवीत होते. त्यांना अटकाव करण्यासाठी कुणीही रस्त्यावर नव्हते. रस्त्यालगत फळांची दुकाने, आॅटो स्टॅण्डवर आॅटोचालकांच्या गप्पा रंगल्या होत्या. काही तरुण बंद पानठेल्याजवळ चर्चा करीत बसले होते. दुपारपासून सायंकाळी ५ पर्यंत तरी त्यांची कुणी अडवणूक केली नाही. ५ वाजतानंतर दोन वाहतूक पोलिसांनी फळांची दुकाने बंद केली. चर्चा करीत असलेल्या तरुणांना हाकलून लावले. हंसापुरीतही लोक गल्लीबोळात चर्चा करीत बसले होते.
कॉटनमार्केट चौकात पोलिसांचा बंदोबस्त
पोलिसांनी कॉटनमार्केट चौकात जोरदार बंदोबस्त लावला होता. महालातून बर्डीकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. तसेच सीताबर्डीकडून महालक डे जाणारा रस्ताही बंद केला होता. मानस चौकातही वाहतूक पोलीस दुचाकी चालकांना थांबवून विचारणा करीत होते. झाशी राणी चौकातही पोलिसांनी वाहनांना थांबवून विचारणा केली.
तुकडोजी चौकात गर्दी
जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिल्यानंतर दुसºया दिवशी मात्र नागपूर लॉक डाऊन असूनही तुकडोजी चौकात नागरिकांची गर्दी होती. ठिकठिकाणी नागरिक टोळक्याने बसले होते. परंतु चौकात एकही पोलीस उपस्थित नव्हता. काही जण मोबाईलवर चौकात लुडो खेळत बसले होते, तर काही जण बंद दुकानांसमोर गप्पा मारताना दिसले. जमावबंदी असूनही तुकडोजी चौक ते मानेवाडा चौकादरम्यान बºयाच ठिकाणी नागरिक गोळा झालेले दिसले.
मानेवाडा चौकात गर्दी
मानेवाडा चौकात बिनधास्त वाहन चालक ये-जा करीत होते. चौकात एका कोपºयात दोन पोलीस खुर्चीवर बसले होते. परंतु कोणत्याही वाहन चालकाला विचारणा करताना तसेच कारवाई करताना दिसले नाही. त्यामुळे नागरिकही बिनधास्तपणे फिरताना आढळले. चौकातून आॅटो वाहतूकही सुरू होती.
उदयनगर चौकात तपासणी
उदयनगर चौकात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. बॅरिकेडस् लावून पोलीस वाहन चालकांना थांबवित होते. बाहेर फिरण्याचे कारण विचारून प्रत्येकाचे ओळखपत्र तपासत होते. उदयनगर चौकात पोलीस असल्याचे समजल्यानंतर बहुतांश दुचाकीस्वारांनी गल्लीबोळातून आपली वाहने काढून आपले घर गाठले.
भाजी विक्रेत्यांच्या दुकानांवर गर्दी
मानेवाडा रिंग रोडवर चार ते पाच ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला आपली दुकाने थाटली होती. नागरिकांनीही येथे भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली. परंतु पोलीस त्यांना हटकताना दिसले नाहीत. वाहनचालकांनी रस्त्यावरच आपल्या दुचाकी उभ्या केल्या होत्या.
दिघोरी चौकात पोलीस पण तपासणी नाही
दिघोरी चौकात ८ ते १० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. पोलिसांनी चौकात बॅरिकेडस् लावले होते. परंतु एकाही वाहन चालकाची पोलिसांनी चौकशी केली नाही. पोलीस बाजूला खुर्च्या टाकून बसले होते. त्यामुळे वाहन चालकही न घाबरता बिनधास्तपणे जाताना दिसले.
मोठा ताजबाग परिसरात गर्दी
मोठा ताजबागच्या परिसरात बहुतांश दुकाने सुरू होती. मोठा ताजबागच्या गेटवर १० ते १२ पोलीस बसलेले दिसले. परंतु रस्त्यावरून ये-जा करणाºया किंवा विनाकारण गर्दी करणाºया एकाही नागरिकांना ते हटकताना दिसले नाहीत.
रेशीमबाग चौकात नाकाबंदी
रेशीमबाग चौकात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करून विनाकारण बाहेर फिरू नका, असा सल्ला पोलीस वाहनचालकांना देत होते.
वाहनचालकांनी पोलिसांना न फिरण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

Web Title: -It's empty on the road! Reality in the sub-capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.