सर्पदंशामुळे पाय कापण्याची आली होती वेळ, अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश
By सुमेध वाघमार | Updated: September 12, 2025 18:55 IST2025-09-12T18:53:11+5:302025-09-12T18:55:33+5:30
Nagpur : नागपूरच्याच एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तब्बल ८ शस्त्रक्रिया व ४५ दिवस उपचार करून त्याचा पाय वाचवला.

It was time to amputate the leg due to a snake bite, but the doctors' efforts were finally successful.
सुमेध वाघमारे
नागपूर: जीव वाचवण्यासाठी पाय कापण्याचा सल्ला मिळालेल्या एका तरुणाला नागपूरच्या डॉक्टरांनी नवसंजीवनी दिली. सर्पदंशामुळे प्रचंड संसर्ग झालेल्या या रुग्णाचा पाय वाचवण्यासाठी काही शासकीयसह खासगी रुग्णालयांनी नकार दिला होता, पण नागपूरच्याच एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तब्बल ८ शस्त्रक्रिया व ४५ दिवस उपचार करून त्याचा पाय वाचवला.
छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील २७ वर्षीय अंकुर भटघरे त्या तरुणाचे नाव. १७ जुलै रोजी अंकुरचा पायाला साप चावला. दुर्देवाने त्याने सुरुवातीचे पाच दिवस गावठी उपचारांवर काढले. त्यामुळे उपचाराची मौल्यवान वेळ निघून गेली होती. जेव्हा त्याला नागपुरात आणले, तेव्हा त्याच्या डाव्या पायाला गंभीर इन्फेक्शन झाले होते. पायातून पस वाहत होता. जखमेवर चक्क अळ्या पडल्या होत्या. दुगंर्धीमुळे कुणीही जवळ उभे राहू शकत नव्हते. परिस्थिती इतकी गंभीर होती की दोन शासकीय आणि एका खासगी रुग्णालयाने त्याचा पाय कापण्याचा सल्ला दिला. एका खासगी डॉक्टरांनी तर उपचार करायलाच नकार दिला. शेवटचा उपाय म्हणून अंकुरला नागपूरच्या सेंट्रल अव्हेन्यूवरील चांडक क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. जी. चांडक यांनी आव्हानात्मक परिस्थितीतही रुग्ण वाचवण्याचा निर्धार केला. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली डॉक्टरच्या टीमने पायावर उपचार सुरू केले. ४५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टरांना अंकुरचा पाय वाचवण्यात यश आले.
अत्याधुनिक उपचार आणि आठ शस्त्रक्रिया
डॉ. चांडक यांनी सांगितले की, रुग्णाच्या पायावर सलग आठ मोठ्या शस्त्रक्रिया केल्या. उपचारासाठी आम्ही प्रगत 'व्हॅक्युम असिस्टेड क्लोजर' सिस्टीमचा वापर केला, ज्यामुळे जखमेतून तब्बल १६ लिटर पस काढण्यात आला. सतत औषधोपचार, ड्रेसिंग आणि शेवटी स्किन ग्राफ्टिंगच्या मदतीने पाय पूर्णपणे बरा झाला. आज अंकुर स्वत:च्या पायावर उभा आहे आणि लवकरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे. यापूर्वी, डॉ. चांडक यांनी एका विषबाधेच्या रुग्णाला वाचवण्यासाठी १९,३२० इंजेक्शन्स देऊन त्याचा जीव वाचवला होता, ज्याची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे.
साप चावल्यानंतर योग्य उपचार घ्या
डॉ. चांडक म्हणाले की, ही घटना केवळ एका रुग्णाला वाचवण्यापुरती मर्यादित नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. साप चावल्यानंतर लगेच योग्य वैद्यकीय उपचार घेणे किती महत्त्वाचे आहे, हे यातून दिसून येते. या जटिल शस्त्रक्रियेमध्ये डॉ. किरण पटेल, डॉ. तरुण देशभ्रतार, डॉ. विनोद बोरकर, डॉ. राजेश द्विवेदी, डॉ. संजय मानकर, डॉ. लेकेश मानकर, डॉ. गौरव बन्सोड, ओटी हेड डॉ. राजू हिवरले, डॉ. गणेश आणि गौरव वर्धेवार यांचाही महत्त्वाचा सहभाग होता.