- तर विदर्भ वेगळा होणे आवश्यक

By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:55:37+5:302014-09-04T00:55:37+5:30

विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

- It is necessary to separate the Vidarbha | - तर विदर्भ वेगळा होणे आवश्यक

- तर विदर्भ वेगळा होणे आवश्यक

अनिल देशमुख यांचे मत : लोकांचे बहुमत असावे
नागपूर : विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मुंबईत मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला. त्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला. त्यावर ना. देशमुख यांनी मत व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाची मागणी ही बरीच जुनी आहे. परंतु, याआधी या मागणीला जनतेचा पाठिंबा नव्हता. ही मागणी लोकांनी केलेली नव्हती. आता मात्र स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील जनता पुढे आली आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल राजकीय पक्षांनी घेणे गरजेचे आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भातील विद्यार्थ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती झालेली आहे. त्या जनजागृतीमुळेच मोठ्या संख्येने या आंदोलनात विदर्भातील जनता सहभागी होत आहे. रस्त्यावर उतरत आहे.
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विदर्भात सध्या ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, मोर्चे निघत आहे. वेगळे विदर्भ राज्य व्हावे अशी विदर्भाचे बहुमत असेल आणि त्या मागणीसाठी वैदर्भीय जनता एकजुटीने उभी राहिल्यास जनतेच्या मागणीचा मान ठेवून वेगळा विदर्भ देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ना. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली. (प्रतिनिधी)
नागपुरात तीन जागांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत नागपूर शहरामध्ये तीन जागा मिळायला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतल्याची माहिती ना. अनिल देशमुख यांनी दिली. मुंबईच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते हजर होते. जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येऊन नागपूर शहरामध्ये आजपर्यंत काँँग्रेसने राष्ट्रवादीला एकही जागा दिली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार नागपूर शहरात उभे करणे आवश्यक असल्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांनी लावून धरला. त्यामुळे नागपूर शहरात विधानसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यात दिल्या पाहिजे, असा विचार नेत्यांनी मांडल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: - It is necessary to separate the Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.