तरुणांमध्ये शुद्ध विचारांची बीजे पेरणे आवश्यक; भाई गुरप्रीतसिंग यांची डॉ. विजय दर्डा यांच्याशी भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:40 IST2026-04-06T12:38:40+5:302026-04-06T12:40:05+5:30
यावेळी सुमारे ३ ते ४ हजार भक्त उपस्थित होते.

तरुणांमध्ये शुद्ध विचारांची बीजे पेरणे आवश्यक; भाई गुरप्रीतसिंग यांची डॉ. विजय दर्डा यांच्याशी भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सध्या देश आणि जगातील नागरिकांत प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव वाढवणे ही काळाची सर्वात महत्त्वाची गरज आहे. इतकेच नव्हे तर देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी ज्या निरागस मुलांच्या आणि तरुणांच्या खाद्यांवर येणार आहे त्यांच्यात अशा
शुद्ध विचारांची बीजे पेरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच प्रयत्नांतून देशाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे विचार आध्यात्मिक मार्गदर्शक भाई गुरप्रीतसिंगजी यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्याशी नागपूरमध्ये झालेल्या भेटीदरम्यान आध्यात्मिक मार्गदर्शक, कीर्तनकार तसेच अमृतवेला ट्रस्टचे मुख्य प्रचारक-संस्थापक भाई गुरप्रीतसिंगजी (रिंकू वीरजी) यांनी हे विचार व्यक्त केले.
या बैठकीदरम्यान जनमानसांत उच्च विचार रुजवण्याच्या कार्यात आपण गुंतलो असल्याचे सांगून याच उद्देशाने नागपूरलाही आलो असल्याचे भाई रिंकू वीरजी म्हणाले. येथील लोक आणि त्यांची भावना खरोखर खूपचांगली आहे. शीख धर्मातील ‘अमृतवेला’चे (सकाळचा प्रहर) महत्त्व सांगण्यासाठी आणि लोकांना गुरबानी व कीर्तनाशी जोडण्यासाठी प्रसिद्ध विद्वान रिंकू वीरजी यांनी या वेळी नागपूर विमानतळावर आपल्या शिष्यांना मार्गदर्शनही केले.
प्रत्येक व्यक्तीने ‘अमृतवेला’ म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर आपल्या आराध्य देवतेच्या नामाचा जप केला पाहिजे. केवळ हेच नाम माणसाच्या अंतिम क्षणी त्याच्यासोबत जाईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी अमृतवेला ट्रस्टचे नागपूरचे प्रमुख हितेश देवानी, कैलाश खेमानी, लतीश देवानी, कैलाश चावला, उमेश गंगवाणी, अमरावतीचे प्रमुख शंकर ओटवानी, संदीप हासानी आणि प्रेमनगर गुरुद्वाराचे प्रमुख भाई सनी विरजी यांच्यासह सुमारे ३ ते ४ हजार भक्त उपस्थित होते.