सरकारी कॅन्टीनमध्ये पदार्थांमध्ये असलेल्या तेल आणि साखरेच्या प्रमाणाचे फलक लावणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:00 IST2025-07-15T16:59:09+5:302025-07-15T17:00:46+5:30
लठ्ठपणाविरोधात केंद्राची नवी पॉलिसी : 'एम्स'सह सर्व कार्यालयांत लागणार 'आरोग्य बोर्ड'

It is mandatory to display signs in government canteens detailing the amount of oil and sugar in food.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या कार्यालयांमधील कॅन्टीनमध्ये आता कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, आदेश आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सर्व केंद्रीय कार्यालये, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) सर्व रुग्णालये आणि शिक्षण संस्थांना त्यांच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या सामोसा, कचोरी, गुलाबजाम यांसारख्या पदार्थांमध्ये असलेल्या तेल आणि साखरेच्या प्रमाणाचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, शहरी भागातील पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे. 'द लान्सेट जीबीडी २०२१'च्या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, २०२१ मध्ये भारतातील लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या प्रौढांची संख्या १८ कोटी होती, जी २०५० पर्यंत ४४.९ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असेल. लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि वंध्यत्व यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. लठ्ठपणा साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
एका गुलाबजाममध्ये पाच चमचे साखर
ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी एका उदाहरणातून या फलकांच्या गरजेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गुलाबजाम समोर आला की, आपण कुठलाही विचार न करता खाऊन घेतो. परंतु, अनेकांना हे माहीत नसते की, एका गुलाबजाममध्ये जवळपास पाच चमचे साखर असते. त्यामुळे खाद्यपदार्थ खाताना असे फलक आरोग्याचा इशारा देणारे ठरतील.
'तेल-साखर बोर्ड'ची अशी असेल संकल्पना
या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व केंद्रीय संस्थांना त्यांच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांखाली त्यात असलेले तेल आणि साखरेच्या प्रमाणाचे बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. या 'आरोग्य बोर्ड'मुळे खाद्यपदार्थांमध्ये लपलेली चरबी आणि साखर उघड होईल, ज्यामुळे ग्राहक अधिक जागरूक होतील.
पंतप्रधानांच्या 'फिट इंडिया'चे पुढचे पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी 'फिट इंडिया' मोहिमेचा उल्लेख करत नागरिकांना सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. 'मन की बात'मध्ये त्यांनी तेलाचा वापर १० टक्के कमी करण्याचे आवाहन केले होते. याची सुरुवात आता केंद्र शासनाच्या कॅन्टीनमधून झाल्याचे बोलले जात आहे.
सूचना आल्यावर लागतील बोर्ड
'एम्स' नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे 'आरोग्य बोर्ड' लावण्याचे पत्र प्राप्त झाले असले, तरी यासंदर्भात स्पष्ट सूचना यायच्या आहेत. त्या मिळताच कॅन्टीनमध्ये संबंधित फलक लागतील.
'काय खातो याचा विचार होईल'
कार्डिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अमर आमले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, केंद्राच्या या नव्या आदेशामुळे सामान्य माणसाला आपण काय खातो आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची जाणीव होईल. खाद्यपदार्थांखालील हे फलक प्रत्येक ठिकाणी असणे गरजेचे आहे.