कामाच्या तणावाने घेतला पुन्हा एक बळी, आयटी अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 06:14 PM2021-09-24T18:14:03+5:302021-09-24T18:19:21+5:30

कंपनीतील कामाच्या व्यापामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या आयटी अभियंत्याने रामटेक शहरालगतच्या खिंडसी जलाशयात गुरुवारी उडी घेत आत्महत्या केली.

it engineer committed suicide over workload | कामाच्या तणावाने घेतला पुन्हा एक बळी, आयटी अभियंत्याची आत्महत्या

कामाच्या तणावाने घेतला पुन्हा एक बळी, आयटी अभियंत्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देखिंडसी जलाशयात घेतली उडी : दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्क फ्राॅम हाेम करत असलेल्या तरुण आयटी अभियंत्याने रामटेक शहरालगतच्या खिंडसी जलाशयात गुरुवारी (दि. २३) उडी घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शुक्रवारी (दि. २४) सकाळी आढळून आला. कामाचा ताण-तणावामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. 

युगांत प्रकाश कडू (२६, लालदिवाण दर्गा, रामटेक) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ताे बंगळुरू (कर्नाटक) शहरातील येथील सिमेन्स केयर या आयटी कंपनीमध्ये नाेकरीला हाेता. काेराेना संक्रमणामुळे ताे काही दिवसांपासून रामटेकला आला आणि घरूनच काम (वर्क फ्राॅम हाेम) काम करायचा. ताे गुरुवारी (दि. २३) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगत त्याच्या माेटारसायकलने घराबाहेर पडला. त्याच्या कंपनीचे काम सकाळी ९ वाजतापासून सुरू व्हायचे. ताेपर्यंत ताे घरी परत न असल्याने कुटुंबीयांंसह मित्रांनी त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली.

दरम्यान, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मित्रांना त्याची माेटारसायकल खिंडसी जलाशयाच्या असलेल्या पंपहाऊसजवळ उभी असल्याचे आढळून आले. संशय बळावल्याने कुटुंबीयांनी स्थानिक व कन्हान (ता. पारशिवनी) पाेहणारे व मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने त्याचा जलाशयात दिवसभर शाेध घेतला. सायंकाळी अंधारामुळे थांबविण्यात आलेले शाेधकार्य शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. त्यातच सकाळी १० वाजताच्य सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाळून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक तिवारी करीत आहेत.

कंपनीच्या कामामुळे तणावात

युगांतने २०१८ मध्ये रामटेक शहरातील किट्समधून कॉम्प्युटर टेक्नाॅलाॅजीमध्ये बीई केले हाेते. सध्या ताे बंगळुरू (कर्नाटक) येथील सिमेन्स केयर या आयटी कंपनीत नाेकरीला हाेता. महिनाभराने ताे दुसरी कंपनी जाॅईन करणार हाेता. ताे काही दिवसांपासून थाेडा चिंतित हाेता, अशी माहिती त्याचे वडील प्रकाश कडू यांनी दिली. त्याच्या घरीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्याचा माेठा भाऊ अभियंता असून, आई शिक्षिका व वडील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. कंपनीच्या कामामुळे ताे मानसिक तणावात असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली असून, यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: it engineer committed suicide over workload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app