कर्ज घेऊन गुंतवणूक… आणि फसवणूक ! नागपुरात पती-पत्नीने रचला २.३७ कोटींचा ठकबाजीचा जाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:31 IST2025-09-17T16:31:05+5:302025-09-17T16:31:48+5:30
'महालक्ष्मी फायनान्शियल'चा मायाजाळ : भेंडे ले-आउटमधील दाम्पत्य झाले पसार

Investment by taking loan… and fraud! Husband and wife in Nagpur create a fraud network of Rs 2.37 crores
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमच्या कंपनीच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पती - पत्नीने ठकबाजीचे रॅकेट रचले. त्यात अडकून नागपुरातील दीड डझनहून अधिक नागरिकांनी २.३७ कोटींहून अधिकची रक्कम गमावली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरोपी पती पत्नी काही महिन्यांपासून फरार आहेत. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रफुल्ल सुधाकर चाटे (४३) व त्याची पत्नी अवनी (रा. सिंधू छाया, भेंडे ले-आउट) अशी आरोपींची नावे आहेत. ते महालक्ष्मी फायनान्शिअल सर्व्हिसेस नावाने फर्म चालवत होते. या फर्मच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करतो, अशी ते बतावणी करायचे. तक्रारदार अमरिन चांदखॉ पठाण (३६, गोपालनगर) यांचा २०१३-१४ मध्ये चाटेसोबत परिचय झाला होता. चाटेने पठाणला नोकरी लावून देण्यास मदत केली होती. मात्र, वर्षभरातच पठाणने नोकरी सोडली.
यादरम्यान त्यांचा चांगला परिचय झाला होता. आर्थिक अडचणीची समस्या चाटेला सांगितल्यावर त्याने त्याच्या फर्मच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला दिला. पैसे नसल्याचे कारण पठाणने सांगितल्यावर अवनीने 'मनी व्हा' या अॅपद्वारे कर्ज मिळू शकते, असे सांगितले. त्यानंतर पठाणने डिसेंबर २०२३पर्यंत एक लाख रुपये गुंतविले. २६ जानेवारी २०२४ पासून दहा महिन्यात दर महिन्याला २० हजार याप्रमाणे २ लाख रुपये देऊ, असे चाटे दाम्पत्याने सांगितले. सुरुवातीला परतावा दिल्याने पठाण यांचा विश्वास आणखी वाढला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांनी ९.६० लाख रुपये गुंतविले. त्याबदल्यात त्यांना १.६० लाख रुपये परतावा मिळाला. परंतु, फेब्रुवारी २०२५ पासून चाटे दाम्पत्याने परतावा देणे बंद केले. ते दरवेळी टाळाटाळ करायचे. काही दिवसांनी त्यांनी फोनच बंद करून टाकले.
एका कागदावर द्यायचे हिशेब
आरोपी चाटे दाम्पत्य हे गुंतवणूकदारांना केवळ कंपनीचे नाव लिहिलेल्या एका कागदावर हिशेब लिहून द्यायचे. पठाण यांना तर एकदाच त्यांनी लिहून दिले होते. समोरच्या व्यक्तीला विश्वासात ओढून आरोपींनी ठकबाजी केली.
१९ जणांची केली फसवणूक
पठाण यांनी चौकशी केली असता चाटे दाम्पत्याने याच पद्धतीने कल्पना दुबे, मिलिंद जोशी, अतुल सावरकर, सरिता मोहने, सरीन आझाद, गणेश उईके, संजय वैरागडे, उमंग जैन यांच्यासारख्या १९ जणांना गंडा घातल्याची बाब समोर आली. आरोपींनी २.३७ लाखांहून अधिकची रक्कम उकळली आहे. पठाण यांच्या तक्रारीवरून आरोपी चाटे दाम्पत्याविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.