विदर्भात सुरू आहे इजराईल-पॅलेस्तिनी नागरिकांची तपासणी
By नरेश डोंगरे | Updated: October 9, 2023 23:56 IST2023-10-09T23:56:15+5:302023-10-09T23:56:45+5:30
भयावह संघर्षाचे सर्वत्र हादरे, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

विदर्भात सुरू आहे इजराईल-पॅलेस्तिनी नागरिकांची तपासणी
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: इजराईल आणि पॅलेस्टीन (हमास)मधील भयावह संघर्षाचे हादरे आणि 'मोसाद'च्या फेल्युअरचा जोरदार धक्का बसल्यामुळे सर्वत्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, या दोन देशातील नागरिक, विद्यार्थी अथवा पर्यटक कुठे मुक्कामी आहेत का, त्याची रात्रीपासून खातरजमा केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात या दोन देशातील नागरिकांच्या वास्तव्याच्या नोंदी तपासणे सुरू केले आहे.
इजरायलची गुप्तचर संस्था 'मोसाद' जगातील सर्वात प्रभावी गुप्तचर संस्था मानली जाते. मात्र, इजराईलवर हल्ला होईपर्यंत 'मोसाद'ला थांगपत्ताही लागला नाही. त्यावरून धडा घेत सर्वच तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारताचे हृदयस्थळ असलेले नागपूर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे वारंवार उघड झाले आहे. दहशतवादी संघटनांचे स्लिपर नागपुरात रेकी करून गेल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे. तर, दोन वर्षांपूर्वी नागपुरात राहून गेलेला एक व्यक्ती नंतर अफगानवर हल्ला चढविताना तालिबानी दहशतवाद्यांच्या वेषात देश-विदेशातील प्रसार माध्यमांवर झळकला होता. हा एकूणच प्रकार लक्षात घेत इजराईल - पॅलेस्तिनी नागरिक पर्यटक अथवा दुसरा कोणता व्हिजा घेऊन नागपूर विदर्भात आले काय, त्याची तपासणी सुरू केली आहे.
विशेष असे की, कोणताही विदेशी नागरिक, कुठल्याही जिल्ह्यात कोणत्याही कारणाने येत असेल तर त्याची नोंद जिल्हा मुख्यालयातील पोलिसांच्या दरबारी केली जाते. तो कशासाठी आला, किती दिवस राहणार, कुठे कुठे आणि कुणाकडे जाणार, त्याच्यासोबत कोण आहे, तेसुद्धा सर्व नोंदवले जाते. त्यामुळे ईजराईल हमासचे युद्ध पेटताच या दोन देशातील नागरिकांच्या वास्तव्याच्या नोंदी तपासणे सुरू झाले आहे.
----
विविध जिल्ह्यात चाचपणी
नागपूर नंतर सर्वाधिक विदेशी नागरिक अभ्यास आणि पर्यटनाच्या दृष्टीने वर्धा (सेवाग्राम-पवनार), चंद्रपूर (ताडोबा), गडचिरोली, गोंदिया (नक्षलग्रस्त भाग), भंडारा आणि विदर्भातील अन्य जिल्ह्यात जात येत असतात. त्यामुळे इजराईल आणि पॅलेस्तिनी दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही तासांपासून नागपूर विदर्भातील सुरक्षा यंत्रणांनी नमूद जिल्ह्यात या दोन देशातील नागरिकांच्या नोंदी तपासणे सुरू केले आहे. सर्वच जिल्हयाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला आज 'आफ द रेकॉर्ड' दुजोराही दिला आहे.
------