योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील दंगलींचा कथित सूत्रधार व एमडीपीचा (मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी) शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याला पोलिसांनी अटक करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या दंगलींची बांगलादेश लिंकदेखील समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नागपूर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांना पत्रदेखील लिहीले आहे.
फहीम खान शमीम खान याने लोकसभा निवडणूक लढविली होती. फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. लोकसभा निवडणुकीत त्याला १ हजार ७३ मते मिळाली होती. आता या प्रकरणात त्याचा सहभाग समोर आल्यावर सोमय्या यांनी त्याचे इतर कनेक्शन तपासण्याची मागणी केली आहे. फहीम खान मालेगाव येथील कट्टरवादी संघटनांसोबत संपर्क असण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यांत मालेगावात दोन मोठे घोटाळे उघडकीस आले. मालेगाव येथील सिराज मोहम्मद व मोहम्मद बगाड यांनी 4 विधानसभा निवडणुकीच्या काळात वोट जिल्हा फंडिंग घोटाळा घडविला. रुपये २२ कोटींच्या या घोटाळ्यात महाराष्ट्र पोलीस व प्रवर्तन निर्देशालय ने कारवाई केली आहे. मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळा ही बाहेर आला आहे. शेकडो अपात्र, घुसखोर बांगलादेशी लोकांनी यात खोटे दस्ताजेव, कागदपत्रे देऊन प्रमाणपत्र मिळवले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आतापर्यंत दोन डझनहून अधिक लोकांची अटक झाली आहे. फहीम खान व मालेगावच्या या घोटाळ्याचे राजकीय व अतिरेकी संघटनेशी संबंध आहेत काय याची चौकशी करावी. तसेच फहीम खानच्या बांगलादेशी कनेक्शनची ही चौकशी करायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.