घरफोडीच्या पैशांतून ‘लक्झरी लाइफस्टाइल’, आंतरराज्यीय चोरट्याला अटक
By योगेश पांडे | Updated: February 10, 2025 03:04 IST2025-02-10T03:03:42+5:302025-02-10T03:04:39+5:30
हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील पथकाची कारवाई : चोरीच्या पैशांतून घेतली कार, मोटारसायकल

घरफोडीच्या पैशांतून ‘लक्झरी लाइफस्टाइल’, आंतरराज्यीय चोरट्याला अटक
नागपूर : घरफोडीच्या पैशांतून ‘लक्झरी लाइफस्टाइल’ जगणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित चोरटा रेकी करून घरफोडी करायचा व मिळालेल्या पैशांतून एखाद्या मॉडेलसारखा जीवन जगायचा. हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
रजनीकांत केशव चानोरे (२४, राजेंद्र वाॅर्ड, शुक्रवारी, निळ्या पाण्याच्या टाकीजवळ, भंडारा), असे आरोपीचे नाव आहे. २४ डिसेंबर रोजी सुरेश शंकरराव सरोदे (६३, महात्मा गांधीनगर) हे मुलाच्या लग्नासाठी कळमना येथे गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला व १.०३ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला होता. खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रजनीकांतला मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील इंद्रनगरातून अटक केली. त्याने प्रताप गोपाल उरकुडे (२५, राजेंद्र वॉर्ड, भंडारा) याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याने हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच चार ठिकाणी घरफोडी केल्याचेदेखील सांगितले. त्याच्याकडून १३० ग्रॅम सोने, एक कार, मोटारसायकल, आयफोन असा १७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतापचा शोध सुरू आहे.
१५ हून अधिक गुन्हे दाखल
रजनीकांत हा अट्टल घरफोड्या आहे. तो किरायाने फ्लॅट घेऊन परिसरात घरफोडी करायचा. त्याच्याविरोधात छत्तीसगडमध्ये तीन, चंद्रपुरात तीन व भंडाऱ्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, नागेशकुमार चातरकर, पंकजकुमार चक्रे, शैलेश ठवरे, नंदकिशोर तायडे, गणेश बोंद्रे, ओमप्रकाश मते, राजेश मोते, मुकेश कन्नाके, राजेश धोपटे, गौरव गजभिये, व हिमांशू पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लग्नमंडपांना करायचा टार्गेट
रजनीकांतची कार्यपद्धती इतर गुन्हेगारांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्याला मोबाइल, आलिशान कार, ब्रँडेड कपडे आणि घड्याळे, जीम आणि महागडे प्रोटीन पावडर यांचा शोक आहे. तो लग्न किंवा मोठे समारंभ असलेल्या घरांनाच टार्गेट करायचा. लग्नाच्या घरात रोख रक्कम आणि दागिने ठेवले जातात. लग्नामुळे लोक दोन ते चार दिवस आधीच मंडप उभारतात. रजनीकांत अशा घराच्या शोधात फिरतो. लग्नासाठी कुटुंबातील सर्व सदस्य संध्याकाळी घराबाहेर पडले की तो रात्री ८ ते १० च्या दरम्यान घर फोडायचा. तो घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर गाडी पार्क करायचा.
चोरीच्या पैशांतून कुंभमेळ्याला गेला
रजनीकांत चोरीच्या पैशांतून प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी गेला. तेथून तो अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर कुंभमेळ्याला परतला. तेथून तो भोपाळमध्ये पोहोचला. त्याचा पाठलाग करत हुडकेश्वर पोलिसही भोपाळला पोहोचले. त्याने सोन्याचे दागिने वितळवून भंडारा येथील एका सोनार मित्राकडे बिस्किटांच्या रूपात ठेवले होते.