नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:22 IST2019-02-04T22:20:35+5:302019-02-04T22:22:15+5:30
नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊं डेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊं डेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेखण, डॉ. उदय गुप्ते, विकास मानेकर, अजय गंपावार, अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गायत्री नगर आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड येथील कविकुलगुरू कालिदास सभागृहामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापालिक आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित राहतील. उद्घाटनप्रसंगी ‘माय ओन गुड’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा भारतीय चित्रपटामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रसिद्ध चित्रपट निर्माते जाहनु बरुआ यांना ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना ‘ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड येथील कविकुलगुरू कालिदास सभागृह व आयनॉक्स जयवंत तुली मॉल येथे चार दिवस सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत ३३ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या चित्रपटांचा लाभ घेता यावे यासाठी चार दिवसांसाठी ५० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघामध्ये प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नि:शुल्क चित्रपट पाहता येणार आहे. देशातील विविध प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.