टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर पुन्हा शंभरीपार !
By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 4, 2024 18:51 IST2024-07-04T18:50:37+5:302024-07-04T18:51:05+5:30
सामान्यांचे बजेट वाढले : वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, पालक स्वस्त

Inflation strikes Tomatoes, green chillies, coriander prices
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुराचे संकट आले आहे. त्याचा परिणाम नागपुरात भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर झाला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही टोमॅटो सर्वसामान्यांचा खिशा रिकामा करण्याची दाट शक्यता आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो दर्जानुसार प्रति किलो शंभरीपार तर हिरवी मिरची १२० आणि कोथिंबीर १५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट वाढले आहे.
कॉटन मार्केट घाऊक बाजारात गुरुवारी टोमॅटो प्रति किलो ६० ते ७० रुपये, हिरवी मिरची ७० ते ८० आणि कोथिंबीरचे भाव ८० ते १०० रुपये होते. किरकोळ बाजारात दुप्पट भावात विक्री होत आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नागपूर घाऊक बाजारात केवळ ५ टक्केच आवक आहे. पावसामुळे माल खराब झाल्यामुळे अन्य भागातूनही २५ टक्केच आवक आहे. टोमॅटो संगमनेर, बेंगळुरू, बुलढाणा, बारीक व मध्यम हिरवी मिरचीचा पुरवठा बुलढाणा आणि मेरठहून होत आहे. मेरठच्या हिरव्या मिरचीची गुणवत्ता खराब आहे. कोथिंबीर छिंदवाडा, उमरानाला, सौंसर आणि रामकोना येथून विक्रीला येत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक येथून कोथिंबीरची आवक जवळपास बंद झाली आहे. किरकोळमध्ये केवळ वांगे, पत्ता कोबी, फूल कोबी आणि पालक परवडणाऱ्या दरात आहेत. वांगे २० रुपये, पत्ता कोबी २० रुपये, फूल कोबी आणि पालकचे भाव प्रति किलो ४० रुपये आहेत. अन्य भाज्यांचे भाव प्रति किलो ८० रुपयांवर गेले आहेत. महागाईत सामान्यांना आर्थिक झळ बसली आहे.