महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 23:59 IST2025-12-17T23:58:47+5:302025-12-17T23:59:48+5:30
ग्राहकांना भरली धडकी

महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
नागपूर: जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि औद्योगिक मागणीतील तुटवडा यामुळे सोने आणि चांदीच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. चांदीने ३ टक्के जीएसटीसह चक्क २.०७ लाख रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला असून, सोन्यानेही १.३७ लाख रुपये प्रति तोळा (२४ कॅरेट) अशी गगनभरारी घेतली आहे. या दरवाढीमुळे सराफा बाजारात शुकशुकाट पसरला असून सामान्य ग्राहक मात्र दागिन्यांच्या दुकानांपासून दुरावला आहे.
एकाच दिवसात चांदी १० हजारांनी महागली
गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. आकडेवारीनुसार केवळ एका महिन्यात चांदीच्या दरात किलोमागे २८ हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
ही आहेत दरवाढीची कारणे
औद्योगिक मागणीत मोठी वाढ झाली असून सौर ऊर्जा क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये चांदीचा वापर प्रचंड वाढला आहे. जागतिक स्तरावर चांदीची उपलब्धता घटल्याने किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरवाढीवर झाला. रशिया आणि युक्रेन आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे वळत आहेत.
सोन्यात ‘झळाळी’, महिन्यात ५ हजारांची वाढ
सोन्यालाही झळाळी प्राप्त झाली आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटीविना २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एक तोळा सोन्याचा दागिना दीड लाख रुपयांवर गेला आहे.
दरांवर एक नजर:
दिनांक सोन्याचे दर चांदीचे दर
- १ डिसें. १,२७,९०० १,७२,९००
- १६ डिसें. १,३२,००० १,९१,३००
- १७ डिसें. १,३२,९०० २,०१,२००
(३ टक्के जीएसटी वेगळा)