Inferior supplies are being supplied to government hospitals in Nagpur | नागपुरातील शासकीय रुग्णालयांना होतोय निकृष्ट पुरवठा
नागपुरातील शासकीय रुग्णालयांना होतोय निकृष्ट पुरवठा

ठळक मुद्देरुग्णांच्या जीवाशीच खेळतांदळाला बुरशी, सडका गहू

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत पोषक आहाराची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयांना रुग्णाच्या एक वेळच्या नाश्त्यासह दोन वेळच्या भोजनासाठी केवळ २५ रुपये शासनाकडून मिळतात. या पैशात ४ रुपये ६६ पैसे प्रति किलोच्या दराचा गहू तर ६ रुपये ३५ पैसे प्रति किलोच्या दराचा तांदूळ विकत घेतला जातो. परंतु या किमतीत पोचट गहू व बुरशीमिश्रित तांदूळ मिळतो. या धान्यातून रुग्णांसाठी खरच पोषक आहार तयार होतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये आहारातज्ज्ञाच्या देखरेखेखाली आहार तयार केला जातो. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (डीएमईआर) अंतर्गत येणाऱ्या शासकीय रुग्णालयांमधील प्रति रुग्णाच्या आहारावर शासन २५ रुपये खर्च करते. परंतु महागाईने आपला उच्चांक गाठला असताना एवढ्या पैशाता एकवेळच्या नाश्त्यासह दोन वेळच्या जेवण्याची सोय करणे रुग्णालय प्रशासनाला कठीण झाले आहे. पूर्वी प्रत्येक रुग्णाला मिळणारे दूध, शेंगदाण्याचा लाडू, उकडलेली अंडी व ‘नॉनव्हेज’ जेवण आता बंद झाले आहे. आता केवळ लहान मुलांना व ‘लिक्वीड’ आहारावर असलेल्या रुग्णांनाच दूध तर इतरांना चहा व ब्रेड किंवा उसळ दिली जाते. तर दुपार आणि सायंकाळच्या भोजनात पातळ वरण, भात, बाजारात जी भाजी स्वस्त असेल ती भाजी आणि पोळी एवढाच मेनू असतो.जास्तीत जास्तवेळा भोपळ्याची भाजीच रुग्णांच्या नशिबी ठरलेली असते.


आता गेल्या काही वर्षांपासून गव्हाचा आणि तांदळाचा दर्जा घसरल्याने रुग्णाच्या आहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राष्टÑ निर्माण संघटनेचे सचिव व सामाजिक कार्यकर्ता नीलेश नागोलकर यांनी तर मेडिकलला मिळणारे निकृष्ट दर्जाचे गहू व तांदळाचे नमुनेच ‘लोकमत’ला आणून दाखविले. आहारासाठी निकृष्ट धान्य नकोच
रुग्णाची आधीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. ती वाढण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु निकृष्ट दर्जाच्या धान्यातून आहार तयार केला जात असेल तर ते चुकीचे आहे. रुग्णांचा आहारासाठी दर्जेदार धान्य असायला हवे, तरच रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होईल.
-कविता गुप्ता, आहारतज्ज्ञ


रुग्णांच्या आहाराकडे शासनाने लक्ष द्यायला हवे
मेयो, मेडिकलमध्ये पुरवठा होणाऱ्या धान्य व इतरही वस्तूंचा दर्जा हा सुमार व अनेकवेळा निकृष्ट दर्जाचा असतो. अन्न प्रशासनाने (एफडीए) यापूर्वीही यावर आक्षेप घेतला आहे. शासकीय रुग्णालयात खेड्यापाड्यातून व दुर्गम भागातून गोरगरिब रुग्ण येतात. यामुळे त्यांना दिला जाणाऱ्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
-नीलेश नागोलकर, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Inferior supplies are being supplied to government hospitals in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.