नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:28 IST2018-12-08T21:26:08+5:302018-12-08T21:28:15+5:30

शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Infectious water in the Gorevada lake in Nagpur | नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

ठळक मुद्देशहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आलेली आहेत. या वस्त्यातील दूषित पाणी तलावात सोडले जाते. यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. शहराच्या अर्ध्या भागाला तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच गोरेवाडा जंगलातील वन्यजीव या तलावातील पाणी पित असल्याने वन्यजीवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात नगरसेविका दर्शनी धवड यांनी महापालिकेच्या विशेष सभेत प्रश्न उपस्थित करून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणली.
गोरेवाडा तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्याचा मुद्दा यापूर्वी सभागृहात अनेकदा उपस्थित करण्यात आला. परंतु महापालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासन लोकांच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले.
गोरेवाडा क्षेत्रातील वन्यजीवाला धोका
गोरेवाडा जंगल संरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर व अन्य वन्यप्राणी आहेत. वन्यप्राणी गोरेवाडा तलावातील पाणी पितात. दूषित पाणी पिल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.
आयुक्तांना चौकशीचे आदेश
दूषित पाण्यामुळे गोरेवाडा तलावातील पाणी दूषित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. महापौरांच्या आदेशानुसार याची चौकशी होते की नाही, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र ट्रंक लाईनची गरज
गोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील वस्त्यातील दूषित पाणी तलावात येऊ नये यासाठी गडरलाईन ट्रंक लाईनला जोडण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

Web Title: Infectious water in the Gorevada lake in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.