इंडिगोचा फटका, खासदारांची गोची अन् कडाक्याच्या थंडीत पोलिसांना घाम
By नरेश डोंगरे | Updated: December 6, 2025 21:42 IST2025-12-06T21:41:56+5:302025-12-06T21:42:32+5:30
व्हीव्हीआयपी मुव्हमेंट वाढली : रेल्वे स्थानकाच्या बंदोबस्तातही वाढ

इंडिगोचा फटका, खासदारांची गोची अन् कडाक्याच्या थंडीत पोलिसांना घाम
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : इंडिगोचे फ्लाईट कॅन्सल झाल्याने अनेक खासदारांनी आपापल्या मतदार संघात परतण्यासाठी रेल्वेचा मार्ग धरला. ईकडे सिक्युरिटी, प्रोटोकॉल असल्याने त्यांच्या आगमनाच्या काही तासांपूर्वीच संबंधित सुरक्षा यंत्रणेला निरोप देण्यात आला. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत रेल्वे पोलिसांची तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांनी धावाधाव करीत मोठा बंदोबस्त लावून ठिकठिकाणच्या खासदारांना रेल्वे स्थानकावर रिसिव्ह केले. नंतर त्यांना त्यांच्या-त्यांच्या वाहनांनी मार्गस्थ करण्यात आले. आज पहाटे ४ ते सकाळी ७ वाजता दरम्यान रेल्वे स्थानकावर पोलिसांना घाम फोडणारा हा प्रकार घडला.
विशेष म्हणजे, सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे राज्य सरकारातील मंत्री, आमदार नागपूरात पोहचणार आहेत. अशात देशांतर्गत सर्वाधिक उड्डाणे उपलब्ध करून देणारी इंडिगो एअर सेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका सर्वच क्षेत्रातील मंडळींना बसला असून अनेक खासदारांचीही त्यामुळे गोची झाली. विमानच कॅन्सल झाल्यामुळे व्यापारी, उद्योजक अन् सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर आमदार, खासदारही हवाई ऐवजी रेल्वेने प्रवास करीत आहेत. शनिवारी, रविवारी कामकाज नसल्यामुळे लोकसभा, राज्यसभेचे बहुतांश खासदार शुक्रवारी सायंकाळी आपापल्या मतदार संघाचा रस्ता धरतात. शुक्रवारी ५ डिसेंबरलाही असेच झाले. मात्र, विमानच कॅन्सल झाल्याने आपापल्या मतदार संघातील नियोजित कार्यक्रमात पोहचण्यासाठी काहींनी 'बाय कार तर काहींनी बाय ट्रेन'चा मार्ग निवडला.
प्रोटोकॉलमुळे संबंधित यंत्रणेला व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेची व्यवस्था करावी लागते. त्यानुसार, शनिवारी पहाटे ४ वाजता स्थानिक रेल्वे पोलिसांना 'राजधानी एक्सप्रेसने चार खासदार महोदय येत आहेत',असा निरोप मिळाला. कडाक्याची थंडी असल्याने धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत. परिणामी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते. अशात वेगवेगळ्या ठिकाणच्या चार खासदारांना एकाच वेळी सुरक्षा देण्याची जबाबदारी आल्याने रेल्वे पोलिसांना कडाक्याच्या थंडीत घाम फुटला. मात्र, अधीक्षक मंगेश शिंदे आणि जीआरपी ठाणेदार गाैरव गावंडे यांनी लगेच ठिकठिकाणाहून जीआरपी पोलिस गोळा करून खासदार अमर काळे (वर्धा), खासदार प्रशांत पडोळे (भंडारा), खासदार शामकुमार बर्वे (रामटेक) आणि राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना सुरक्षा देत रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणले. नंतर हे चारही खासदार त्यांच्या त्यांच्या वाहनांनी आपापल्या मतदार संघात निघून गेले.
बीडीडीएस, डॉग स्कॉड सज्ज
सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने आणि विमाने रद्द होण्याची मालिका सुरूच असल्याने मंत्री, आमदारांनी रेल्वेने नागपूरकडे धाव घेतली आहे. ते लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे पोलिसांनी स्थानकावर आत-बाहेरच्या परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथक, श्वान पथकाकडून रात्रंदिवस आलटून पालटून तपासणी केली जात आहे.