ड्रोन हल्ल्यांवर स्वदेशी उत्तर! : नागपूरच्या SDAL कंपनीकडून 'भार्गवास्त्र'चे यशस्वी परीक्षण
By शुभांगी काळमेघ | Updated: May 15, 2025 16:53 IST2025-05-15T16:50:56+5:302025-05-15T16:53:00+5:30
आत्मनिर्भर भारताचे नवे अस्त्र : भार्गवास्त्रचे यशस्वी परीक्षण

Indigenous answer to drone attacks!: Nagpur's SDAL company successfully tests 'Bhargavastra'
शुभांगी काळमेघ
नागपूर : नागपूरच्या सोलर डिफेन्स अॅण्ड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) या खासगी कंपनीने 'भार्गवास्त्र' नावाची ड्रोन-विरोधी शस्त्र प्रणाली तयार केली व त्याची यशस्वीरित्या चाचणी केली आहे. हे शस्त्र ड्रोन स्वार्म म्हणजेच एकत्र येऊन हल्ला करणाऱ्या अनेक ड्रोनना एकाचवेळी नष्ट करण्याची क्षमता ठेवते.
ही चाचणी ओडिशामधील गोपालपूर येथील लष्करी चाचणी परिसरात झाली. यामध्ये ‘भार्गवास्त्र’ने एकाच वेळी ६४ मायक्रो रॉकेट्स सोडले आणि त्यावर अचूक वार केला. या परीक्षणावेळी लष्कराच्या एअर डिफेन्स विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘भार्गवास्त्र’ची खास वैशिष्ट्ये:
- एकाच वेळी अनेक रॉकेट्स फायर करण्याची क्षमता
- लहान ड्रोनपासून मोठ्या UAV (मानवरहित विमान) पर्यंत नष्ट करण्याची क्षमता
- ५ ते १० किमी अंतरावर काम करू शकणारी रेंज
- मोबाइल वाहनांवर बसवता येणारी, सहज हलवता येणारी प्रणाली
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून अचूक लक्ष्य
- इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप (सॉफ्ट किल) आणि प्रत्यक्ष नाश (हार्ड किल) दोन्ही मोड्स
आत्मनिर्भरतेकडे पाऊल
भार्गवास्त्र ही प्रणाली पूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आली आहे. यापूर्वी SDAL कंपनीने ‘नागास्त्र-१’ नावाचा ड्रोन देखील यशस्वीरीत्या विकसित केला होता. आता ‘भार्गवास्त्र’च्या माध्यमातून भारत लष्करी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक पायरी वर चढला आहे. ही प्रणाली भारतीय लष्कराच्या गरजेनुसार अजून सुधारण्यात येत आहे. भविष्यात ही प्रणाली सीमा सुरक्षेसाठी आणि महत्वाच्या ठिकाणी ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी उपयुक्त ठरेल.