पुन्हा ‘लॉकडाऊन’चे संकेत : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला तयारीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:09 AM2020-07-19T00:09:59+5:302020-07-19T00:13:08+5:30

कोविड-१९ संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत दिले असून नागरिकांना जागरुक करणे हा याचा मुख्य उद्देश असल्याचे म्हटले आहे.

Indications of 'Lockdown' again: Guardian Minister's instructions to the administration | पुन्हा ‘लॉकडाऊन’चे संकेत : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला तयारीचे निर्देश

पुन्हा ‘लॉकडाऊन’चे संकेत : पालकमंत्र्यांचे प्रशासनाला तयारीचे निर्देश

Next
ठळक मुद्देपुरवठा व्यवस्था सुदृढ केल्यानंतर तारखेची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत दिले असून नागरिकांना जागरुक करणे हा याचा मुख्य उद्देश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाला लॉकडाऊन पूर्वी पुरवठा व्यवस्था सुदृढ करून यासंदर्भात रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. रिपोर्ट आल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल. दरम्यान रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मात्र याचा विरोध केला आहे.
कायदा व सुव्यवस्था तसेच कोविड-१९ च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, बैठकीत लॉकडाऊनवर सखोल चर्चा झाली. कोविड-१९ च्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ती रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्याच्या पर्यायावर चर्चा सुरु आहे. ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे गरीब लोक धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित होतात. त्यामुळे पुरवठा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या लॉकडाऊनचा उद्देश नागरिकांना जागरुक करणे हा आहे. लोकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊनमध्ये राहावे लागेल, असा संदेश याद्वारे देण्यात येणार आहे. लॉकडाऊन कधीपासून लागू केले जाईल, याची माहिती नागरिकांना अगोदरच दिली जाईल. त्यामुळे ते यासाठी तयार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी बैठकीत गणेशोत्सव व ईद-उल-जुहा आदी सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यादरम्यान त्यांनी कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासही सांगितले. बैठकीत खा. कृपाल तुमाने, आ. विकास ठाकरे, माजी आमदार प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस सहआयुक्त नीलेश भरणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही.डी. पातूरकर, डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.

खासदार तुमाने यांनी केला विरोध
रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी बैठकीत लॉकडाऊनचा विरोध केला. त्यांनी म्हटले की, ही खरीप पिकाची वेळ आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागले तर शेतकरी बी-बियाणे, खत कुठून आणतील. ग्रामीण भागात रुग्णांची संख्यासुद्धा नियंत्रणात आहे, असेही ते म्हणाले.

नियमांचे पालन होत नसल्याबाबत गृहमंत्र्यांची नाराजी
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु त्यात वाढ होत आहे. कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी शासन व प्रशासनाने जारी केलेल्या दिशानिर्देश व नियमांचे पालन होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांनी प्रशासन व पोलीस विभागाला लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरतेने पालन करण्याचे निर्देश दिले. यासोबतच लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे आणि नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास वेळ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

भाजपच्या आमदारांना न बोलावल्याने रोष
कोविड-१९ चा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत भाजपला दूर ठेवण्यात आले आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले की, भाजपच्या एकाही आमदाराला या बैठकीत आमंत्रित करण्यात आले नाही. एकीकडे मंत्री कोविड-१९ चा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत समन्वय राखण्याचे निर्देश देतात. परंतु दुसरीकडे या गंभीर विषयासाठी होणाऱ्या बैठकीपासून भाजपला दूर ठेवले जाते. कोविड-१९ ची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणून हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

Web Title: Indications of 'Lockdown' again: Guardian Minister's instructions to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.