नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आम्ही सुखाने राहावे म्हणून आमचे शूरवीर जवान हाडं गोठवणाऱ्या थंडीत आणि रखरखत्या उन्हात शत्रूंच्या सिमेवर स्वत:च्या जिवाची बाजी लावतात. मात्र, आमची वेळ येते तेव्हा आम्ही त्यांची कशी कुचंबना करतो, ते उघड करणारा एक व्हीडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. सेनेच्या जवानांसाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय रेल्वेतीलच हा व्हीडीओ असून, या व्हीडीओमुळे प्रशासन तसेच तमाम भारतीयांवर लज्जेने मान खाली घालण्याची वेळ आणली आहे.
भारतीय लष्करातील सैनिकांच्या पराक्रमाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. त्यांची जांबाजी, दिलेरी तर शब्दातीत असते. भारतीयांच्या रक्षणासाठी ते थेट मृत्यूच्या जबड्यात शिरण्याची तयारी दाखवितात. शत्रूराष्ट्र पाकिस्तानसोबत सुरू असलेला संघर्ष सध्या जगभरात लक्षवेधी ठरला आहे. या संघर्षात भारतीय सैन्याने दाखविलेले शाैर्यही जगभरात प्रशंसेचा विषय ठरले आहे. हे शाैर्य दाखविताना काही शूरांना वीरमरणही आले आहे. नातेवाईकांच्या, स्वत:च्या लग्नाला आलेले हे सूपूत्र पाकिस्तानसोबत युद्ध सुरू होताच हळदीने भरलेल्या अंगाने सिमेवर जाऊन लढत आहेत. प्रत्येक सैनिक आपापल्या बटालियनमध्ये परतण्यासाठी रेल्वेकडे धाव घेत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीमुळे आधीच रेल्वे गाड्यांमधील गर्दी प्रचंड वाढली आहे. अनेक गाड्यात पाय ठेवायला जागा नाही. एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला सीटवर, बर्थवर बसण्यासाठी सोडा, बाजुला उभे राहण्यासाठीही जागा द्यायला तयार नाही. अशात कर्तव्यावर तैनात होण्यासाठी परतणाऱ्या जवानांचीही दखल घेण्याचे त्यांना भान उरलेले दिसत नाही. देशासाठी लढायला निघालेले हे वीर जवान ट्रेनमध्ये जागा नसल्याने चक्क रेल्वे गाड्यांच्या टॉयलेटजवळ बसून, झोपून प्रवास करीत असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हीडीओतून पुढे आला आहे. हा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे.
व्हीडीओ कोणत्या ट्रेनमधला ?सेनेच्या जवानांसाठी स्पेशल ट्रेनचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला या व्हीडीओने जोरदार चपराक लावलेली आहे. हा व्हीडीओ कोणत्या ट्रेनमधला ते स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ अधिकारी त्याबाबत अनभिज्ञता दाखवत आहेत.
'त्यांचे'ही दुर्लक्षलष्कराचे जवान अशा पद्धतीने प्रवास करीत असताना 'त्या' ट्रेनमधील टीसी, आरपीएफ जवान काय करीत होते. त्यांनी या वीरांना सन्मानाने गार्ड कोचमध्ये का बसविले नाही आणि ट्रेन मॅनेजरने याकडे का लक्ष दिले नाही, असे संतप्त प्रश्न उपस्थित झाले आहेत.